पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्थांना वापरणे कठीण व्हावे इतकी साधने, संपत्ती आणि सन्मान अगदी सहजासहजी उपलब्ध झाली नसती.
 अशास्त्रीय शाश्वती
 पर्यावरणवाद्यांच्या सद्हेतूबद्दल, सद्भावनेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही पण त्यापलीकडे त्यांच्याकडे काही असले तर ते तपासून घ्यावे लागेल. उदा: त्यांची शाश्वततेची कल्पना कितपत शास्त्रीय आहे? सातवी-आठवीच्या पदार्थ विज्ञानशास्त्राच्या पुस्तकात वेगवेगळ्या तऱ्हेच्या कारंज्यांचे प्रयोग केले जातात. थोडीफार बुद्धी असलेले सर्व विद्यार्थी त्या वयात शाश्वत कारंजा तयार करण्याच्या प्रयत्नास लागतात. शाश्वतता ही विज्ञानाच्या मूलभूत नियमानुसार अशक्य आहे. 'जातस्यहि ध्रुवो मृत्यः।' तेव्हा ही पृथ्वी चिरंतन कालापर्यंत चालणारी आहे ही कल्पना शास्त्रीय नाही. पृथ्वीसारखे ग्रह या अफाट विश्वात रोज एक या गतीने तरी खपत असावेत.
 शक्य होईल तितका पृथ्वीचा बचाव करावा याबद्दल कोणी वाद घालत नाही; पण खांद्यावर शबनम अडकवून फिरणाऱ्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना पृथ्वीच्या जीवनमरणाची चिंता जे.आर.डी. टाटांपेक्षा अधिक आहे असे मानायला काही कारण दिसत नाही. पृथ्वी जगवायची कशी याचे पर्यावरणवाद्यांना काही विशेष ज्ञान झाले आहे असेही दिसत नाही. झाडे लावणे हा त्यांचा आवडीचा कार्यक्रम. त्यामुळे पाऊस पडतो, निसर्गाचे संतुलन राहते, असा त्यांचा लाडका सिद्धांत; पण सर्व महाराष्ट्रभर जंगलेच जंगले असताना सतत तेरा वर्षे पाऊस पडला नाही आणि दुर्गादेवीचा कराल दुष्काळ झाला, हे कसे ? हे ते सांगू शकत नाहीत. सगळा राजस्थान भाक्रा-नान्गलच्या पाण्याने हिरवागार झाला तर मान्सूनचे चक्र थांबेल काय ? आणि बाकी सारा देश वाळवंट बनेल काय? या शक्यतेबद्दल ते काहीच ठामपणे सांगू शकत नाहीत. "पृथ्वीचा विनाश प्रदूषणापेक्षा एखाद्या ग्रहखंडाच्या टकरीने होण्याची शक्यता अधिक आहे. अशी टक्कर टाळायची तर त्याकरता लागणाऱ्या औद्योगिक उत्पादनाने प्रदूषणाचे प्रमाण आणखीनच वाढणार हे नक्की.
 जुने समाजवादी

 कोणत्याही उद्योगाचा पर्यावरणावर काही ना काही अनिष्ट परिणाम होतोच. कोणत्याही प्रकल्पातील असले दोष दाखवून त्यांना विरोध करणे इतपतच पर्यावरणवाद्यांचे ज्ञान. खुल्या व्यवस्थेपेक्षा समाजवादी नियोजनाने विकास होतो हा सिद्धांत खोटा ठरला, जग खुल्या व्यवस्थेकडे जाऊ लागले

बळिचे राज्य येणार आहे / १०८