पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्राणिमात्र आणि मानव यांची वस्ती सर्वकाळ अबाधितपणे चालू राहील असेच तंत्रज्ञान वापरले पाहिजे अन्यथा पृथ्वीचा नाश अटळ आहे असा त्यांचा आग्रह आहे.
 जगाच्या इतिहासात प्रत्येक पायरीला आता ही पृथ्वी बुडते, आता विनाश जवळ आला अशा आरोळ्या ठोकणारी मंडळी दृष्टीस पडतात. पहिली आगगाडी भूगोलावरून धावू लागली तेव्हा सृष्टीचा विनाश जवळ आला असे आधुनिक पर्यावरणवाद्यांचे पूर्वज करवादले होते. पहिले कारखाने उभे राहू लागले तेव्हा ही सारी हरित सृष्टी आता लुप्त होणार याची चिंता पडलेल्यांत टॉलस्टॉय, रस्कीन यांचीही गणना आहे. लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढते आणि अन्नधान्याचे उत्पादन मात्र गणिती श्रेणीने वाढते तेव्हा मनुष्यजात भूकबळीने नष्ट होणे अपरिहार्य आहे असे भाकीत यांच्याच पूर्वजांनी वर्तवले होते. ही सगळी भकिते खोटी पाडून माणूस जिवंत राहिला, एवढेच नव्हे तर तो सुधारला, जास्त सुखी झाला हेही सत्य आहे.
 ऊर्जास्रोतांचा कारकुनी हिशेब

 ठराविक पेन्शन मिळणारे म्हातारे आपले सगळे दैनंदिन जीवन त्या रकमेत बसवण्याचा आरखडा तयार करतात, म्हणजे मरेपर्यंत आपणास काही कमी पडू नये. असला हिशेब मानवजात करत नाही. मनुष्य धडपडतो, स्वत:च्या 'स्वातंत्र्याच्या कक्षा' रुंदावण्याकरिता भगीरथ प्रयत्न करतो, निसर्गाची रहस्ये आणि प्रमेये शोधून काढतो. बैलाच्या ताकदीपासून वारा, पाणी, कोळसा, वीज, पेट्रोलियम, अणुपर्यंत ऊर्जेचे अनेक स्रोत त्याने वेसण घालून सेवेस ठेवले आहेत. उरलेल्या पेट्रोल स्रोतांचा नेमका हिशेब मांडून मनुष्यजातीच्या पुऱ्या भविष्यात ते पुरतील अशा गतीने जपून जपून वापरण्याची पद्धती माणसाच्या स्वभावाला जमणारी नाही. पेट्रोल संपले तर त्या जागी दुसरी काही साधने तयार करू, अणुंचा वार करू, समुद्रांच्या लाटांना कामी लावू, सूर्याची ऊर्जा वापरू आणि एक दिवस सूर्यच विझत आला तर त्या जागी एखाद्या तारकेला ओढीत आणून पेटवून देऊन नवा सूर्य उभा करण्याची त्याची जिद्द आहे. पर्यावरणवाद्यांनी प्रगतीला खीळ घालण्याची कोशीस शतकानुशतके केली, पण माणूस थांबला नाही. कर्तबगारी गाजवू इच्छिणाऱ्या पोराला घरातील म्हाताऱ्यांनी सावधगिरीचा सल्ला द्यावा हे योग्यच ; त्याचा काही ना काही उपयोग होतोच. पर्यावरणवाद्यांत काही भली मंडळीही आहेत. मनुष्याच्या भवितव्याविषयी त्यांना वाटणारी चिंता खरीखुरी आहे. अन्यथा या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि

बळिचे राज्य येणार आहे / १०७