पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 व्यक्तींनी नफ्याचा पाठपुरावा केल्यामुळे देशाचे नुकसान होते या वावदूक कल्पनेचा जागतिक ऐतिहासिक पराभव झाला आहे.
 स्वातंत्र्याच्या कक्षा
 नैसर्गिक शेतीत निसर्गाशी सहजीवन साधले जाते, नैसर्गिक शेती आत्मिक सुख आणि आनंद देते, त्याबरोबर नैसर्गिक शेतीत तयार होणारा माल अधिक पौष्टिक, चवदार असतो. रासायनिक खतांतून तयार झालेल्या मालाच्या सेवनाने माणसाचा स्वभाव बिघडतो, आध्यात्मिक अध:पतन होते असेही वेगवेगळे युक्तिवाद ऐकवले जातात. कोणत्या पदार्थाच्या सेवनाने मनुष्यप्राण्याची आध्यात्मिक उन्नती किंवा अवनती होते हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही. नैसर्गिक शेतीतील माल अधिक रुचकर, पौष्टिक असतो हे मानण्यास मी तयार आहे; पण याच कारणाने नैसर्गिक शेती शेतकऱ्यांना आणि ग्राहकाला मान्य होईल ही कल्पना मनुष्यस्वभावाच्या चुकीच्या निदानावर आधारलेली आहे. स्वामी चिन्मयानंद एक अनुभव सांगत. पहाटे चार वाजता उठून तांब्याभर पाणी प्याले तर कोठा साफ राहतो, प्रकृती चांगली राहते, उत्साह वाटतो हे सगळे खरे; पण असा अनुभव घेऊनही उष:पान करणारे विरळाच. याउलट, धूम्रपानाने प्रकृती बिघडते, कॅन्सरसारखे भयानक रोग होतात हे माहीत असूनही एका झुरक्याच्या तलफेसाठी माणसे वेळी अवेळी कोसच्या कोस अवघड रस्त्याने पायी चालत जातात. नैसर्गिक शेतीतून आरोग्य, शांती मिळत असेल पण आरोग्य-सुख-शांती ही मनुष्यप्राण्याची उद्दिष्टे नाहीत; माणसाचे उद्दिष्ट स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याचे असते. पोटॅशिअम सायनाइडसारख्या जहाल विषाची केवळ चव कळावी आणि मरण येण्याआधी ती लिहून ठेवता यावी यासाठी अनेकांनी प्राण गमावले आहेत असे म्हणतात.
 रासायनिक शेतीतील इतर दोष काहीही असोत, त्यात उत्पादनावरील शेतकऱ्याचे नियंत्रण अधिक सज्जड आहे. रासायनिक शेतीला जो काही पर्याय निघेल तो माणसाच्या स्वातंत्र्याच्या कक्षा बंदिस्त करणारा असेल तर त्याची स्वीकृती कठीण आहे.
 पर्यावरणवाद्यांची भयानक भकिते

 निसर्गशेतीच्या चळवळीला धर्मवाद्यांप्रमाणेच पर्यावरणवाद्यांचाही मोठा धोका आहे. शाश्वत शेती किंवा सदा सर्वकाळ चालणारी शेती अशी कल्पना पर्यावरणवादी मांडतात. वर्तमान पिढीचा विकास उद्याच्या पिढ्यांच्या वारसाला धक्का न लागता झाला पाहिजे, जेणेकरून ही सुंदर पृथ्वी आणि त्यावरील

बळिचे राज्य येणार आहे / १०६