पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कांचनमुक्तीचे कांचनमृग
 धर्मवाद्यांप्रमाणेच एक वेगळे अध्यात्म सांगणारी मंडळी निसर्गशेतीत मिरवत आहेत. यात प्रामुख्याने गांधीवादी, सर्व सेवा संघवाले कांचन मुक्तिवादी यांची गणना आहे. निसर्गशेतीचा पुरस्कार करताना ते शेतीतील व्यावसायिकतेवर उघड उघड हल्ला करतात. कोणी 'ॲलन जॉर्ज' हा त्यांचा आवडता लेखक, त्याचे एक वचन उद्धृत केले जाते.
 "जेव्हा तेव्हा शेतकऱ्याने वास्तविक शेती करण्याचे, अर्थात तिच्यापासून आपली व आसपासच्या समाजाची आवश्यकता पूर्ती करण्याऐवजी आपले उत्पादन दूर, लांब पाठवून पैशाच्या लालसेने विकण्यास सुरुवात केली व तिला व्यापाराचे रूप दिले तेव्हा त्याने संकट विकत घेतले व जमिनीचे शोषण करून हिरव्यागार शेतीचे वाळवंट केले."
 "स्वत: व गाव यांच्या स्वावलंबनाऐवजी नफ्यासाठी शेती करील" या बुद्धीने शेतकरी निसर्गापासून दूर गेला आणि त्याने स्वत:चे, देशाचे नुकसान केले अशी मांडणी 'सर्व सेवा संघ'वाले करतात.
 दुढ्ढाचार्यांची मळमळ

 आपले हित कशात आहे, आपल्या पोराबाळांचे, कुटुंबाचे हित कशात आहे हे शेतकऱ्यांना कळत नाही; शेतीत काय पिकवावे याचे शहाणपण त्यांनी 'आम्हाकडून' घ्यावे, जग पैशाच्या मागे लागले तरी शेतकऱ्यांनी मात्र सेवाभावी जीवन काढावे अशी दांभिकता या विचारसरणीत आहेच. त्याखेरीज, वैयक्तिक नफ्यापेक्षा काही व्यापक उच्च तत्त्वांच्या आधाराने देशातील साधनसंपत्तीचा वापर अधिक चांगला होतो, असाही एक सिद्धांत आहे. सर्वसामान्य संसारी लोकांना त्यांचे हित काय कळणार? षड्रिपूंच्या कर्दमात ते बिचारे गटांगळ्या खात असतात. आम्ही परमेश्वरी ज्ञानाचे वारसदार त्यांना मोक्षाचा मार्ग दाखवतो असा अहंकार धर्मवाद्यांनी वर्षानुवर्षे मिरवला. गहू किती पिकवावा, कोथिंबीर किती लावावी हे शेतकऱ्यांना काय समजणार ? त्यासाठी राजधानीतील नियोजन मंडळात बसलेली 'दुढ्ढाचार्य' मंडळी आकडेमोडी करून निर्णय घेतील ही समाजवाद्यांची आणि नेहरूवाद्यांची मांडणी. व्यक्तीच्या प्रेरणा देशघातक असतात आणि देशहित कळते ते आध्यात्मिक किंवा अर्थशास्त्री दुढ्ढाचार्यांना. कारण त्यांच्याकडे काही 'महान व्यापक दृष्टिकोन'असतो. समाजवादी त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या आधाराने समाजावर हुकुमत बसवू पाहत होते. गांधीवादी तशाच तोंडवळ्याचा कार्यक्रम आध्यात्माच्या पायावर देत आहेत.

बळिचे राज्य येणार आहे / १०५