पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/101

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करतात. हा कलही हळूहळू बदलेल. परदेशात जैविक शेतीमालाचा आग्रह वाढतो आहे. साहजिकच आपल्या देशातील पंचतारांकित मंडळीही जैविक मालाचा आग्रह धरू लागली आहेत. बाजारपेठेचा हा कल राहिला तर उद्योजक शेतकऱ्यांना रासायनिक खतांबरोबरच औषधांचा वापर कमी करावा लागेल. बाजारपेठेत भारताची जवळ जवळ मक्तेदारी होऊ शकेल. या दृष्टीने ही मंडळी निसर्ग शेतीचे महत्त्व मानतात.
 रासायनिकाचे पुरस्कर्ते नाहीत
 'निसर्गशेती' आणि 'रासायनिक शेती' असे दोन शब्दप्रयोग वापरले तर रासायनिक शेतीचे खंदे पुरस्कर्ते अथवा समर्थक असे कुणीच नाही. रसायनेच वापरा, जैविक खते वापरूच नका असा अतिरेक रासायनिकात सापडत नाही. नैसर्गिक खते चांगली पण पुरवठा म्हणून थोड्याफार प्रमाणात रसायनाचा उपयोग करणे सोयीचे आणि फायद्याचे असते एवढीच काय ती त्यांची मांडणी आहे. हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचे खंदे पुरस्कर्ते कोणी नाहीत; पण गेल्या ३० वर्षातील यातंत्रज्ञानाच्या वापराचे समर्थन करणारे अनेक आहेत. हरितक्रांती तंत्रज्ञानाला ३० वर्षांपूर्वी पर्याय नव्हता. जर का तो वापर झाला नसता तर देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला नसता, लक्षावधी माणसे उपासमारीत सापडली असती असे त्यांचे म्हणणे आहे. मला असे वाटते की या विषयावर मतभेद नसावा.
 चहूकडे निसर्गशेतीच
 कित्येक शतके हिंदुस्थानात सारी निसर्गशेतीच चालू आहे. रसायनांचा उपयोग या शतकातच आला आणि त्यांतही विशेष करून गेल्या ३० वर्षांतच आला. आजही वरखतांचा वापर इतर देशांच्या तुलनेने अगदीच कमी आहे. तो वापर खात्रीशीर पाणीपुरवठा असलेल्या क्षेत्रात; गहू, भात, ऊस, कापूस अशा काही मोजक्या पिकांत आहे. बाकी शेतीत रसायनांचा वापर अगदीच किरकोळ आहे. देशातील जवळ जवळ ४० % शेतीत आजदेखील कणमात्र युरिया पडत नाही. निसर्गशेतीच्या शेकडो वर्षांत देशांत दुष्काळ पडत राहिले, माणसे उपाशी मरत राहिली. आजही ४० % शेतकरी निसर्गशेती करतात तरी देश अडचणीतच आहे. तेव्हा निसर्गशेती सगळ्या रोगांवरचा एक मोठा उपाय आहे असली भाषा विद्वानांनी खुशाल वापरावी, शेतकऱ्यांना ती परवडणारी नाही.

 निसर्गशेतीच्या विरुद्ध कोणीच नाही. या झेंड्याखाली काही प्रवृत्ती मात्र

बळिचे राज्य येणार आहे / १०३