पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एका बैठकीत स्टॅलिननं या दोन्ही अर्थशास्त्रज्ञांचा तीव्र विरोध केला. बुखारीनला अटक करण्यात आली, प्रियाब्रेझेन्स्कीला फाशी देण्यात आले. अर्थशास्त्राचा गाढा व्यासंगी असलेल्या बुखारीनलाही नंतर कोर्टामध्ये माफीची आशा दाखवून त्याच्याकडून काहीही कबूल करवून घेऊन हास्यास्पद बनवले आणि नंतर मारून टाकण्यात आले. या दोघांनाही मारल्यानंतर स्टॅलिनने आपली शेतकऱ्यांविरुद्धची आघाडी उघडली. देशामध्ये दुष्काळ पडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती, गव्हाची वसुली व्यवस्थित होत नव्हती आणि शेतकऱ्यांनी गव्हाची किंमत वाढवून मागितली. स्टॅलिनने म्हटलं की, शेतकऱ्यांना जर आज गव्हाच्या किमती वाढवून दिल्या तर उद्या हे शेतकरी सोन्याची घड्याळं मागतील आणि स्टॅलिनने रणगाडे पाठवून जमीनदारांचा बीमोड केला. त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि आता एक समाजवादी प्रयोग शेतीमध्ये होतो आहे, आम्ही सामुदायिक शेती करणार आहोत, आता हजारो, लाखो हेक्टर जमिनीची लागवड यंत्राच्या साहाय्याने कुळं किंवा मजूर करणार नाहीत; सहकारी संस्थांचे सदस्य करतील अशी मोठी जाहिरात करून आपल्या कृतीचं समर्थन केलं. आज आपल्याला दिसतं आहे की हा शेतीतला समाजवादी प्रयोग फसला आहे, तो बासनात गुंडाळण्याचं काम चालू आहे. हा प्रयोग फसण्याचं कारण स्पष्ट आहे. १९३० मध्ये जेव्हा स्टॅलिननं शेतीकऱ्यांवर रणगाडे पाठवले तेव्हाच मार्क्सवाद हा खोटा आहे, मार्क्सवादाचा पराभव झाला आहे हे सिद्ध झालं. कामगारांच्या शोषणातून भांडवलनिर्मिती होत नाही. ती होते शेतकऱ्याच्या शोषणातून हे सिद्ध झाल्यामुळे मार्क्सवादी अर्थशास्त्राला काही स्थान राहिलंच नाही. मार्क्सवादाचा पराभव १९३० मध्येच झाला. कापं गेली, भोकं राहिली होती ती बुजवण्याचं काम आता १९९० मध्ये सुरू झालं आहे.

 पाश्चिमात्य देशांचं औद्योगिकीकरण हे त्यांच्या साम्राज्यवादावर आधारलेलं होतं. युरोपमधले चिमूटभर देश, पण या चिमूटभर देशांतील लोकसंख्या वाढता वाढता त्यांनी जगातले सगळे खंड व्यापून टाकले होते. आज आपल्याला लोकसंख्येवर मर्यादा ठेवण्याचा शहाणपणा सागंणाऱ्या युरोपीय लोकांनी दोनशे तीनशे वर्षांपूर्वी सगळं जग व्यापून टाकलं, अमेरिका पाहावी तर त्याच गोऱ्या लोकांनी भरलेली, दक्षिण अमेरिका पाहावी तर ती निम्मी त्यांनी भरलेली, आफ्रिकेमध्ये त्यांच्या मोठ्या वसाहती, आशियावर त्यांचंच साम्राज्य ऑस्ट्रेलियासारखा सबंध खंड त्यांनी ताब्यात घेतलेला. अमेरिका, कॅनडा या

बळिचे राज्य येणार आहे / १२