पान:बलसागर (Balsagar).pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कुणालाही समाधान व आनंद व्हायला हवा होता. ज्यासाठी सगळे समाजसुधारक आपली लेखणी आणि वाणी गेली शंभरएक वर्षे झिजवत आले, ती गोष्ट हिंदू समाजाने मान्य केली, हा समाज आपल्यावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कटिबद्ध होतो आहे, त्यासाठी नित्याचे विधायक कार्य आणि नैमित्तिक मिरवणूका, मेळावे वगैरे भरवून जनजागरणाचा वेग वाढवू पाहत आहे, हे दृश्य चांगले की वाईट ? भले ही वेग मीनाक्षीपुरमच्या धक्क्यामुळे वाढला असेल ! मूळ हेतू यामुळे साध्य होत असेल तर अशा दृश्यांचे वास्तविक स्वागतच व्हायला हवे - त्यातील अतिरेक टाळण्याचा इशाराही हवाच; पण स्वागत आणि हक्काचा इशारा राहिला बाजूला; ओरड उठली, अशी मिरवणूक काढणाऱ्या संघटनांवर बंदी घालण्याची ! असा सगळा सध्या पूर्वग्रहदूषित मामला आहे. त्यामुळे अजून काही काळ तरी महाराष्ट्राच्या राजकीय - सामाजिक जीवनातले हे दोन प्रवाह वेगवेगळे राहणे अटळ दिसते. विचार बदलले तरी संस्कार तेच राहतात. संस्कारांच्या पातळीवरचा समन्वयच टिकाऊ ठरतो. असे जरी असले तरी वैचारिक व बौद्धिक पातळीवरून समन्वयाची भूमिका मांडत राहण्याला महत्त्व आहेच. हे कार्य द. न. गोखले यांच्या लेखाने उत्तम साधले गेले आहे. श्री. गोखले यांचे याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

 पत्रिकेच्या संपादकांनी या विषयावर अधिक चर्चा व्हावी म्हणून श्री. गोखले यांचा लेख काहीजणांकडे पाठवला. यापैकी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री. ग. वा. बेहरे व श्री. ना. ग. गोरे यांनी लेखावरील प्रतिक्रिया पत्रिकेला कळवल्या; त्याही वरील अंकात संपादकांनी छापल्या आहेत. तर्कतीर्थांची प्रतिक्रिया नोंद घेण्यासारखी आहे. तर्कतीर्थांनी म्हटले आहे : 'देशातील सर्व जातीजमातींचे म्हणजे नागरिकांचे हितसबंध परस्पर-पोषक व परस्परांच्या अत्मोन्नतीस संपूर्ण पणे उपकारक असावे लागतात.' असे हितसंबंध समाजरचनेत 'दृढमूल' झालेले असले म्हणजे 'तेथे राष्ट्र म्हणून एक सामाजिक, राजकीय संघटना अस्तित्वात येते.'

 तर्कतीर्थांचे हे मत मान्य केल्यास जगात आज एकही देश 'राष्ट्र' ठरू शकणार नाही. राष्ट्राभिमानासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लंडमध्ये आजही हुजूर आणि मजूर आहेत. त्यांचे संबंध परस्परांच्या आत्मोन्नतीस संपूर्णपणे उपकारक समजायचे का? ते नसल्यास आणि नाहीतच-इंग्लंडचे राष्ट्रीयत्व तोवर 'वेटिंग लिस्ट' वर ठेवायचे का ? अमेरिकेतले निग्रो आणि गोरे यांच्यात उघडउघडच वैरभाव आहे. मग अमेरिकेला 'राष्ट्र' ही पदवी तर्कतीर्थांकडून मिळवायला आणखी किती शतके वाट पाहावी लागेल ? आदिवासी समाजात हितसंबंध

।। बलसागर ।। ९८