पान:बलसागर (Balsagar).pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वातंत्र्यसमराचे एक भव्य स्मारक तेथे उभे राहणे अवघड नाही. हे स्मारक उभारण्यासाठी, उभारले गेल्यानंतर ते पाहण्यासाठी भारतीय मंडळी मग तेथे जाऊ लागतील; आज वेगळे वाटणारे, दूरचे वाटणारे हे बेट मग भारताचाच एक खराखुरा भाग होऊन जाईल. खरे तर सावरकरांची तीन ठिकाणी स्मारके या जन्मशताब्दीनिमित्त व्हायला हवीत. एक पूर्व किनाऱ्यावर, अंदमानला'स्वातंत्र्यवीर सावरकरांचे. दुसरे, पश्चिम किनाऱ्यावर, रत्नागिरीला-जात्युच्छेदक-विज्ञानवादी- ‘हिंदू संघटक' सावरकरांचे आणि तिसरे मुंबईचे-'अखंड भारतवादी' सावरकरांचे. सावरकरांच्या जीवनाची ही तीन पर्वे आहेत आणि या तीनही पर्वात सावरकर हा एकाकी झुंज देणारा एक योद्धाच होता. आज त्यांचे ' जयोस्तुते' रेडिओ-टिव्हीवर प्रसंगोपात्त लागत असले तरी, हे स्वातंत्र्यगीत जेव्हा त्यांना स्फुरले तेव्हा, एक माथेफिरू क्रांतिकारक, एक दहशतवादी, म्हणूनच त्यांची संभावना, त्या काळातल्या थोरामोठ्यांकडून होत होती. ज्यावेळी त्यांनी रत्नागिरीत समाजसुधारणेची चळवळ केली त्याही वेळी त्यांना अनुसरणारे हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकेच होते आणि शेवटच्या पर्वात तर काय ? सैनिकीकरणाचा, अखंड भारताप्रित्यर्थचा सगळा लढा म्हणजे प्रवाहाविरुद्धचे पोहणे. कुठली श्रद्धा त्यांना हे अखंड संघर्षशील जीवन जगण्याचे बळ देत होती ? बरेचसे सावरकर बुद्धिनिष्ठ, तर्कवादी आहेत- एक आधुनिक चार्वाकच हा आगरकरांनंतरचा; पण हिंदू समाजात पुनरुत्थानाची एक सुप्त शक्ती आहे, आजवर अनेकदा पराभूत होऊनही हा समाज पुन्हा पुन्हा वर उठलेला समाज आहे, अशी त्यांची एक मनोमन श्रद्धा होती. हिंदू अश्वत्थाचे मी एक सळसळते पान आहे,' अशी त्यांची स्वतःविषयीची भावना होती. ही भावना, ही श्रद्धा त्यांना बळ पुरवीत होती, एकाकी अवस्थेतही झुंजत राहण्याची.


 सावरकरांची ही श्रद्धा अगदीच अंधश्रद्धा नसावी.
 या अश्वत्थ-भावनेलाही ' लब्धप्रकाश इतिहास निसर्ग मानाचा' काही आधार लाभलेला असावा.
 कारण तशा घटना अवती-भवती खूप घडत आहेत.
 अंदमानात स्थापन झालेली सावरकर जन्मशताब्दी समारोह समिती ही अशा अनेक घटनांपैकी एक.

जून १९८२

।। बलसागर ।। ९६