Jump to content

पान:बलसागर (Balsagar).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फाडताना यापेक्षा अधिक काळजीपूर्वक हात चालवतो. सिमल्याच्या व्हाइसरीगल लॉजमध्ये व्हिस्कीची एक जोरदार चषक ठोकून चार तासात व्ही. पी. मेनन फाळणीची योजना कागदावर उतरवतात काय, माऊंटबॅटन घाईघाईने योजनेला नेहरूंची संमती घेतात काय आणि अॅटलीसाहेब अवघ्या पाच मिनिटात तिच्यावर शिक्कामोर्तब चढवतात काय ? आकाशातून भगवान् शंकराच्या मस्तकावर, तेथून हिमालयावर, तेथून सपाट भूप्रदेशावर, तेथून अनेक मुखांनी सागराकडे वहात जाणाऱ्या भागिरथीप्रमाणेच, आमच्या पूज्यस्थानी असणाऱ्या या नेत्यांचा ‘राष्ट्रीय अधःपात' टाळण्याची एकच संधी व वेळ हीच होती. पेटलेल्या कलकत्त्याचे आणि धुमसणाऱ्या पंजाबचे आव्हान स्वीकारणे ! स्वातंत्र्य कोठेही जात नव्हते. ब्रिटिश सरकार पेचात सापडले होते. स्वातंत्र्य देण्याशिवाय त्यांना गत्यंतरच नव्हते. ही परिस्थिती त्यावेळच्या सर्व मुत्सद्यांना पूर्णपणे समजलेली होती. हुकमाचे पान काँग्रेस नेत्यांच्या हातात पडण्यास फार तर थोडा अवधी लागला असता एवढेच ! परंतु फाळणी आणि त्यामुळे घडून आलेल्या कत्तली निश्चित टाळता आल्या असत्या. 'भारताने अहिंसेने स्वराज्य मिळविले' या आत्मप्रौढीला सत्याचा थोडा तरी आधार मिळाला असता !

 आणि फाळणी पत्करून कोणते प्रश्न सुटले ? कोणत्या समस्या हातावेगळया केल्या ! काश्मिरच्या सीमेवर पाकिस्तानी आक्रमण थोपवून धरण्यासाठी देशाच्या तिजोरीतून रोज काही लाख रुपये खर्ची पडत आहेत. महाराष्ट्राच्या तृतीय पंचवार्षिक योजनेला केन्द्रीय सरकार जेवढी मदत करणार आहे, त्यापेक्षा अधिक रकमेचा-पाचशे कोटी रुपयांचा भूर्दड पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांसाठी भारताला सहन करावा लागला आहे. देशात मुस्लिम लीगचे भूत जिवंत आहे ते आहेच. भारतातील कोट्यवधी मुसलमानांचा भारताच्या निधर्मी राजवटीवर विश्वास नाही तो नाहीच. सिंधू नदीचे पाणी द्या, वर कोट्यावधी रुपयांची दक्षिणा द्या; मंगला धरणाखाली गावे जाऊ द्यात, त्रिपुरात पन्नास हजार पाकिस्तान्यांचे तळ पडू द्यात-आणि तरीही फाळणीने हिंदु-मुसलमानांचा प्रश्न मिटला, या समाधानात आम्हाला राहू द्या! तेव्हा भेडसावणारे सर्व प्रश्न आजही कायम आहेत, ही गोष्ट कोणालाही नाकारता येत नाही. मग तेव्हाच हा सारा पुढचा विवेक पाहून फाळणी धिःकारली का गेली नाही ? जे लिंकनला साधले, ते आम्हाला का साध नये ! शीखांच्या स्वतंत्र भाषिक राज्याची मागणी फेटाळून लावताना नुकतेच पं. नेहरू गरजले, " देश यादवी युद्धाच्या खाईत लोटला गेला तरी चालेल, पण देशाचे यापुढे तुकडे मी होऊ देणार नाही." हीच भाषा, पंडीतजी, १५ वर्षापूर्वी उच्चारली असतीत तर ! तर साक्षात् नगाधिराज हिमालयालाही आपल्या उत्तुंग महिमानाचा हेवा करावासा वाटला असता !

।। बलसागर ।। ३