पान:बलसागर (Balsagar).pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

याभोवती आज घोटाळणाऱ्या कुणातही ही लाट उठवण्याचे सामर्थ्य असणार नाही. एखादा टिळक, एखादा गांधीच, अशी लाट उठवू शकतो-जो नव्या मातीत घुसतो, नवी माणसे घडवतो, नीतीचे, चारित्र्याचे, नवे मानदंड स्थापित करतो, थंड गोळयाचे मग अग्निगोलकात रूपांतर होत असते. युगारंभ दिसू लागतो. अशी माती जागवणारा, हलवणारा, आज कोण आहे ?
 अशांच्याही फौजा लागतील-ज्या खेडोपाडी पोचतील, जंगलात राहतील. मोजक्या ठिकाणी साचलेली संपत्ती आणि सत्ता मोकळी करून समतेचे वातावरण सर्व देशभर निर्माण करतील.


 कारण नेहरूंच्या लोकशाही युगानंतर अवतरणाऱ्या युगाचे नाव आहे समतायुग.
 हे समतायुग निर्माण झाले तरच लोकशाहीयुग टिकणार आहे. त्यामागच्या स्वातंत्र्ययुगाचाही अभिमान बाळगता येणार आहे.
 नाहीतर नुसतीच आपण गाणी म्हणत बसू-
 ‘आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ! स्वातंत्र्य भारताचे !'

ऑगस्ट १९७२

।। बलसागर ।। ६५