पान:बलसागर (Balsagar).pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्याख्यानात ते म्हणाले होते : उद्याच्या भारताची घडण आजच्या आमच्या परिश्रमांवर अवलंबून आहे. औद्योगिक आणि इतर क्षेत्रात भारताची उन्नती होईल, विज्ञानात आणि तंत्र शास्त्रात त्याची प्रगती होईल, आमच्या लोकांचे जीवनमान वाढेल, शिक्षणाचा प्रसार होईल, आरोग्य सुधारण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल आणि कला आणि संस्कृती लोकांचे जीवन समृद्ध करतील याविषयी मला मुळीच शंका नाही...परंतु मला जी चिंता आहे ती केवळ आमच्या भौतिक प्रगतीविषयीच नव्हे तर आमच्या लोकांचे शील आणि त्यांच्या मनाची सखोलता याविषयी आहे. औद्योगिक प्रगतीने सामर्थ्य प्राप्त झाल्यामुळे वैयक्तिक संपत्ती आणि सुखी जीवन साध्य करून घेण्याच्या प्रयत्नात आम्ही आमचे व्यक्तिमत्त्व तर गमावणार नाही ना ? तसे झाले तर ती एक शोकांतिका ठरेल ... (मौ. अबुल कलम आझाद स्मारक-व्याख्यानातून.)

 ।नेहरूयुगाचा हा माध्यान्ह आहे. यशकीर्तीप्रतापाच्या नौबती दणाणत आहेत–तरी या शोकांतिकेचे सूरही दूरवरून ऐकू येण्याइतके स्पष्ट आहेत. भारत विजयी आहे. पण भारताचे मन खोलवर कुठेतरी आक्रंदतही आहे. ज्या गुणांसाठी भारत प्रसिद्ध होता ते गुण आज मातीमोल ठरलेले आहेत. नैतिकतेचे दिवसाढवळ्या वाभाडे निघत आहेत, सत्ता आणि संपत्तीने विद्येचा आणि विनयाचा बळी घेतला आहे. या प्रवृत्ती अशाच फोफावत राहिल्या तर जी लोकशाहीची, आर्थिक समृद्धीची वृक्षवाढ नेहरूंनी केली ती तरी टिकून राहणार आहे का ? कुठल्याही युगाचा अस्त हा नैतिकतेच्या अभावापासून सुरू होतो. नैतिकता याचा येथे अर्थ साधे मानवी सद्गुण. प्रामाणिकपणा, सत्याचरण, कष्टाची हौस, नाविन्याची ओढ, परस्पर सद्भाव, आणि विश्वास, दानत, स्वार्थापलिकडे थोडे तरी पाहण्याची वृत्ती–कशाकशाचा सध्या मागमूस आढळेनासा झाला आहे. सत्तेने आणि संपत्तीने काहीही दाबता येते, खरीदता येते, हे आजकालचे तत्त्वज्ञान बनू पाहत आहे. उद्याची जाणीव नाही. कालचा धरबंद नाही. आजचे आणि आत्ताचे तेवढेच पाहणे ज्याला त्याला अभिप्रेत दिसते. हीच ती युगांताची चाहूल नसेल का ?

 युगांतानंतर नवयुगाची सुरुवातही होतच असते. भारतात हे नवयुग केव्हा अवतरणार ? या युगाचा शिल्पकार कोण असेल ? सारे आज अनिश्चित, भविष्यात कोणीच डोकावू शकत नाही. एवढे मात्र खरे की, या युगाची लाट एखाद्या राजधानीतून, महानगरातून उसळलेली दिसणार नाही. सत्ता आणि संपत्ती

।। बलसागर ।। ६४