पान:बलसागर (Balsagar).pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 
 माध्यान्ह!

 

 स्वातंत्र्याची पंचवीस वर्षे म्हणजे नेहरूंंची, नेहरू कुटुंबाची पंचवीस वर्षे. १९४७-४८ पासून हे नेहरूयुग सुरू झाले. सध्या या युगाचा माध्यान्ह आहे - जरा कललेला.
 या युगसूर्याचा प्रवास मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडे असा झाला - चालू आहे. नेहरू गंगेचे सुपुत्र खरे. पण आपादमस्तक पाश्चिमात्य आचारविचारात रंगलेले, वाढलेले. त्यामुळे पश्चिमेचा, विशेषतः इंग्लंडचा थोर वारसा त्यांच्या रक्तात प्रारंभीच भिनला. या मुळावर त्यांनी थोडेबहुत पौर्वात्य - भारतीय संस्कार केलेही. पण अखेरपर्यंत प्रबळ राहिला, भारतीय भूमीत त्यांनी वाढवला - फुलवला तो एक पश्चिमेकडचा वृक्ष होता. या भूमीत, प्लासीच्या लढाईनंतर पेरल्या गेलेल्या बीजाचा हा एक गगनावर गेलेला विस्तार होता.
 संसदीय लोकशाही, संमिश्र अर्थव्यवस्था ही या वृक्षाला आलेली दोन मोठी फळे. इतर अनेक थोर व्यक्ती, पक्षोपपक्ष यांचा या फलनिष्पत्तीत महत्त्वाचा वाटा असला तरी हे फलित मुख्यतः नेहरूंच्या प्रयत्नांचे. नेहरूची देणगी, नेहरूयुगाचा वारसा म्हणून जो काय मानायचा तो हा आणि हा एवढाच.

 तसा भारताचा शोध नेहरूंनी फार उशीरा घेतला. पूर्वेकडेही ते फार शेवटी शेवटी वळले. त्यामुळे एकीकडे लोकशाही आणि संमिश्र अर्थव्यवस्था यांची पायाभरणी चालू असतानाच त्यांना दुसरीकडे असेही अंधुकसे जाणवू लागलेले होते की, हा पाया कुठेतरी कमी पडतो आहे, कच्चा राहतो आहे, वरचे बांधकाम बरेचसे अर्धवट व एकतर्फी होत आहे. ५९ साली केलेल्या एका महत्त्वाच्या

।। बलसागर ।। ६३