Jump to content

पान:बलसागर (Balsagar).pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मालिकेत नोंदला जावा इतका मोठा नाही. मुळात हा सामना तुल्यबलांचा नव्हता. पाकिस्तान हा भारतापेक्षा फारच लहान देश. जन्मापासूनच दोन तुकड्यात फाटलेला. एक तुकडा लोकमताच्या दृष्टीने आपल्याला संपूर्ण अनुकूल असलेला. सैन्यबल आपल्या मानाने खूप कमी. आपले पायदळ दहा लाख तर पाकिस्तानचे तीन ते चार लाख. पाकिस्तानपेक्षा आपल्या विमानदलाची संख्या दुपटीहून थोडी अधिक. तोफखानादलाचे प्रमाण तर एकास तीन असे. रणगाडादल फक्त आपल्यापेक्षा निम्याहून थोडे अधिक. असा हा विषम सामना जिंकला नसता तरच आश्चर्य होते. आंतरराष्ट्रीय सामरिक विक्रमाची पातळी कोणती आहे ? भोवताली तेरा विरोधी अरब देशांचे कोंडाळे असताना, सहा दिवसात इस्रायलसारख्या टिचभर राष्ट्राने इजिप्तसारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाला धूळ चारली; ही आंतरराष्ट्रीय विक्रमाची पातळी आहे. किंवा व्हिएतनामचे युद्ध. एक गरीब आणि लहान राष्ट्र अमेरिकेसारख्या धनाढ्य आणि शस्त्रास्त्रसंपन्न बड्या राष्ट्राला दाती तृण धरायला लावते, हा जगाने चकित व्हावे असा सामरिक चमत्कार आहे. या मानाने आपला सध्याचा सामरिक विजय अल्प आहे व तो संयमानेच साजरा करणे आपल्याला अधिक शोभादायक ठरणार आहे.
 तरी हा विजय लक्षणीय आहे, अभिमानास्पद आहे, तो वेगळ्या दोन कारणांसाठी
 १ : यापूर्वीच्या दोन्ही भारत-पाक संघर्षात जवान शौर्याने लढले तरी विजयाची कोणतीच निर्णायक जागा आपल्याला सर करता आलेली नव्हती. पासष्टच्या युद्धात लाहोर आपण घेतले नाही. पाकिस्तानने तिखट प्रतिकार केला की, आपल्यालाच लाहोरवरचा कबजा अभिप्रेत नव्हता, हे गुलदस्तात आहे. पण त्यामुळे सामना बरोबरीने सुटला असेच सवचे मत बनले. शिवाय मिळालेले अल्पस्वल्प विजयही आपण ताश्कंदला हरवून आलो. तसे यावेळी काही घडले नाही. डाक्का आपण जिंकले ! शत्रुसैन्य शरण आले ! विजयावर आता शिक्कामोर्तब झालेले आहे. विजय निःसंदिग्ध, निर्णायक व लहान असला तरी निरपवाद आहे.

 २ : आपली सेना ही खरीखुरी मुक्ति सेना ठरली आहे. जितांनाही आपण सभ्यतेने वागवीत आहोत. आपली प्रेरणा मुलुखगिरीची, विस्तारवादाची, प्रदेश गिळंकृत करण्याची, कुणालाही गुलाम बनविण्याची नाही. शेजारी देशातील जनतेला उलट गुलामगिरीतून मुक्त करण्याची आहे; आणि हा मुक्तिसंग्राम संपल्यावर या दुर्दैवी जनतेवर कुठलेही वर्चस्व न गाजवता, सन्मानपूर्वक निरोप घेण्याची आहे. जसा रामाने बिभीषणाला राज्याभिषेक करवून लंकेचा निरोप घेतला होता ! इतकी विशुद्ध नैतिकता त्या इतिहासप्रसिद्ध लाल मुक्तिसेनांनीही

।। बलसागर ।। ६१