पान:बलसागर (Balsagar).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 
 स्वातंत्र्य जेव्हा मिळाले

 



 भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास म्हणजे दोन-चार विभूतींच्या प्रयत्नांचे व पराक्रमांचे गौरवगान, असे समीकरण आज जवळजवळ रूढ आहे. मग कोणी आपापल्या पूर्ववयातील संस्कारांमुळे वा अनुभवांनी झालेल्या मतांप्रमाणे 'वासुदेव बळवंत ते सुभाषचंद्र' या सशस्त्र क्रांतिकारकांची गीते गातील, तर कोणी साबरमतीच्या संताला मनोभावे शरण जातील. जणु समाज म्हणजे एक निर्जीव मातीचा गोळा होता आणि जो आकार त्याला देण्याचा या विभूतींनी प्रयत्न केला, तो आकार त्याने निमूटपणे बिनतक्रार धारण केला. या व्यक्तिप्रधान विभूतिपूजक मांडणीमुळे इतिहासाची चाके पक्षपाताच्या व वैयक्तिक गुणदोषदिग्दर्शनाच्या ठराविक चाकोरीत रुतून बसतात व विशिष्ट घटनेपासून जो काही बोध वा समज भावी पिढ्यांनी घ्यावा अशी अपेक्षा असते, ती सफल होत नाही.

 गांधी, नेहरू, वल्लभभाई या व इतर व्यक्तींचा मोठेपणा व त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात बजावलेली कामगिरी कमी लेखण्याचा मुळीच हेतु नाही. परंतु एक गोष्ट जाणवते की, स्वातंत्र्यप्राप्तीच्या त्या आणीबाणीच्या व महत्त्वपूर्ण कालखंडांत या व्यक्ती व एकंदरीत त्यावेळचे आमचे सर्वच नेतृत्व अगतिकपणे, येईल त्या परिस्थितीचा स्वीकार करीत होते. तसे पाहिले, तर देशाची फाळणी यांपैकी कोणालाच नको होती. नेहरू, गांधीजींनी शेवटपर्यंत तिला विरोधच केला. मग मनापासून नको असलेली फाळणी या नेत्यांना को मान्य करावी लागली ? जीनांनी दिलेले यादवी युद्धाचे आव्हान स्वीकारून, फाळणीची योजना धिक्कारून टाकण्याचे धैर्य या नेत्यांना त्या ऐतिहासिक क्षणी का दाखविता आले नाही ?

।। बलसागर ।। १