पान:बलसागर (Balsagar).pdf/59

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उसाचे क्षेत्र कमी करून अधिक जमीन व पाणी धान्योत्पादनाकडे वळविण्याचा निर्णय ते घेऊ शकतात. जादा जमिनी अपंग सैनिकांच्या पुनर्वसनासाठी राखून ठेवू शकतात. एकटा अकलुज तालुका एका पलटणीचा खर्च अशा त-हेने भागवू शकतो. फार कशाला ? या मंडळींनी आपल्या सरकारकडील थकवाक्या पुया केल्या, घेतलेली कर्जे ताबडतोब परत केली, तरी युद्ध प्रयत्नात त्यांचे सहकार्य मोलाचे ठरणार आहे. पण असे काही घडणार नाही. घडेल असे की, लक्षभोजने विसरली जातील. ( समाजवादी ) फोरमवाले आणि लक्षभोजनवाले सगळेच एक होतील व एखादा जुजबी देखावा उभा करून वटहुकुम, सीलिंग वगैरे पंधरा कलमी कार्यक्रम युद्ध परिस्थिती म्हणून खुटीवर टांगून मोकळे होतील. वास्तविक युद्ध परिस्थिती म्हणून तर हा पंधरा कलमी कार्यक्रम ताबडतोब अंमलात आणायला हवा. याऐवजी तो बासनात गुंडाळून ठेवण्याची केवढी तत्परता या मंडळींनी दाखवली आहे. केवळ चर्चा करण्यासाठी बोलाविलेली मुंबईची बैठक एकदम रद्द ! आणीबाणीचे निमित्त !

 म्हणून अशी आघाडी आज हवी आहे, की ती या दोन्ही मोर्चावर काम करील. संघर्ष हवा पण तो रचनात्मकही हवा. अगोदर शत्रूशी मुकाबला, मागाहून रचना, ही विभागणी, ही फारकत चुकीची आहे. आपली ताकद या फारकतीमुळे खच्ची होणार आहे. अमेरिकेने मदत यांबवली, चीन युद्धात पडला तर आज नाही उद्या हे आपल्याला करावेच लागणार आहे. मग हे घडण्याची वाट पाहण्यात काय अर्थ आहे ? शुभं च शीघ्रम्. जवान तर आघाडीवर लढण्याचे आपले कर्तव्य चोखपणे बजावीत आहेत. लोकनेत्यांनी मात्र उगाच युद्धाची आणि देशभक्तीची पोकळ भाषणे ठोकीत गावोगाव हिंडण्यापेक्षा अशा त-हेने रचनात्मक संघर्षाचे तळ जागोजाग संघटित केले तर ती अधिक भरीव कामगिरी ठरणार आहे. जनशक्ती तर जागृत आहेच. तिला समाजवादी तत्त्वावर संघटित करण्याचे लांब पल्ल्याचे कार्य अधिक महत्त्वपूर्ण आहे हे आपण करू लागलो की, एकीकडे पाकिस्तानची कबरही खणली जाईल, दुसरीकडे सामाजिक व आर्थिक समतेचे राज्य भारतात सुस्थिर होऊन, आशियातील लोकशाहीचा मजबूत बालेकिल्ला म्हणून, जागतिक पातळीवरही आपल्याला गौरवाचे स्थान प्राप्त होईल. पाकिस्तान नष्ट होणे याचा अर्थ जुन्या साम्राज्यवादी शक्तींनी ठेवलेला आपल्या विकास मार्गातील एक अडसर कायमचा दूर होणे. पाकिस्तान नष्ट होणे याचा अर्थ हिंदू-मुस्लिम वैरातील दाहकता, विषारीपणा नाहीसा होऊन, हे दोन समाज बंधुत्वाच्या समान पातळीवर एकत्रित येण्याच्या नव्या युगाचा प्रारंभ होणे. यासाठी ही पाकिस्तानची बेडी

।। बलसागर ।। ५८