पान:बलसागर (Balsagar).pdf/55

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यला हवे, घटनेतील ३७० व्या कलमासारखे काश्मिरच्या भारतीयकरणास आडकाठी करणारे जे कायदे असतील ते ताबडतोब रद्द व्हायला हवेत, विशेष सवलती वगैरे देऊन भारतीयांना तेथे उद्योगधंदे काढण्यास, शेतीवाडी करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे. काश्मिरला अलग ठेवुन, तो भारताचा अविभाज्य भाग आहे म्हणून अधूनमधून गर्जना करण्याचा आजचा हास्यास्पद प्रकार ताबडतोब थांबायला हवा. करायचे असेल तर हे सगळे आणि असेच आणखी कितीतरी मुळापासून करा, तडकाफडकी लवकर करा. नाहीतर शेख अब्दुल्लांच्या हातात काश्मिरची किल्ली सोपवण्यावाचून तुम्हाला गत्यंतर उरणार नाही. कारण इतकी वर्षे तुरुंंगात खितपत पडूनही शेख अब्दुल्ला हेच आज काश्मिरी मुसलमानांचे नेते आहेत; जवळजवळ दैवताप्रमाणे त्यांच्यावर सर्वांंची अपार श्रद्धा आहे. त्वरेने भारतीयकरण किंवा अब्दुल्लांसमोर लोटांगण हे दोनच पर्याय आज उपलब्ध आहेत. तिसरा पर्याय म्हणजे आज आहे तो. सतत पेटलेले एक कुंड. कधी घुसखोर उठाव करतील, कधी पंडित मारले जातील, कधी फुटबॉल मॅचवरूनही दंगली उसळतील, जाळपोळी होतील. काही नेम नाही. भारताचा पैसा जात राहील, सैन्यबल खर्ची पडेल आणि काश्मिर कणाकणाने, क्षणाक्षणाने भारतापासून दूर दूरच जात राहील. काय ते लवकर ठरवा, त्याप्रमाणे कणखर कृती करा- वेळ आता फार थोडा उरला आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबर १९६७।। बलसागर ।। ५४