बरोबरचा मुलगा रडत-ओरडत घरापर्यंत जाऊन काही गडीमाणसांना तेवढ्यात घेऊन आला नसता, तर माझे प्राण वाचणेच कठीण होते. सगळीकडून मार बसत होता आणि मी निपचीत रस्त्यावर पडून होतो. टांग्याचे घोडे कोणीतरी पळवून नेले आणि रॉकेल वगैरे ओतून टांग्यालाही आग लावण्यात आली. बराच आरडाओरडा झाला, घरातली एकदोन गडीमाणसे आली, थोड्या वेळाने पोलिसही पोचले. सगळ्यांच्या मदतीने मी घरापर्यंत कसब सा पोचलो, तो तिथेही सगळा शुकशुकाट. भांडी-कुंडी, कपबशा, लाकडी स्टैंड्स, आलमाऱ्या- जे जे हाताने उचलून नेण्यासारखे होते ते सगळे सामान नाहीसे झाले होते. मौल्यवान चीजवस्तू जी सापडली ती पळवण्यात आली होती. दगडफेक सुरू झाली तेव्हा मागील दाराने घरातील बायकामाणसे दुसरीकडे निसटली म्हणून त्यांना काही इजा पोचली नाही. पण घरही सोडवेना. त्यामुळे जी रेंगाळली त्यांना काही अनुचित प्रकार सहन करावे लागलेच.
‘केव्हा घडला हा प्रकार !' मी.
'अठ्ठावीस तारखेला.'
'पोलीस तपास वगैरे सुरू आहे का ?' मी.
‘आले होते दोन-चार वेळा. नावे सांगा असे म्हणत होते. पण मी लुटालूट करताना कोणाला पाहिलेच नाही तर नावे कोणाची सांगू ! माझ्यावर हल्ला कोणी केला ते पण आठवत नाही. पण पोलिसांच्या खरोखरीच मनात असते तर त्यांना गुन्हेगार सपडणे बिलकुल अवघड नव्हते. घरातले इतके सामान पळवले गले आहे की, पाच-पन्नास घरांचा शोध घेतला तर काही ना काही वस्तू सापडल्याशिवाय राहणार नाहीत अशी माझी खात्री आहे. म्हणून पोलिसांचे शोधाशाधीचे नुसते नाटकच चालू आहे असे मला वाटते.'
‘शेजारीपाजारी नंतर आले होते का ? त्यांच्या काय प्रतिक्रिया ?' मी
‘येतात, खाली मान घालून बसतात. वाईट झाले असे म्हणतात. बाहेरचे लोक आले होते असे सांगतात. पण ते किती खरं बोलतात, मनापासून सांगतात हे काही समजत नाही. कदाचित ते काही करू शकले नसतील हेही खरं असेल-मला मात्र काहीच मत बनवता येत नाही.'
'पुढे काय ?' मी.
‘प्रश्नच आहे. एवढा मोठा दवाखाना, प्रॅक्टिस. शिवाय शेतीवाडी, मळा,घर. राहण्याला आता मन कचरतं, सोडावं तरी पंचाईत.'
'आपला दवाखाना कुठे आहे ?' मी.