पान:बलसागर (Balsagar).pdf/51

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमचे स्वागत केले एवढेच, नंतर मात्र खोल्यामागून खोल्या ओलांडल्या, एक दोन जिने चढलो तरी कुठे आवाज नाही, हालचाल नाही. रहस्यकथेतल्या एखाद्या भुजंगनाथ देशमुखांच्या जुनाट पडक्या वाड्यात शिरावे तसे वाटत होते. याच भयमिश्रित कुतूहलाच्या मन:स्थितीत शेवटी तिस-या मजल्यावरील एका कोप-याच्या लहानशा खोलीच्या दाराशी आम्ही- मी (माणूस प्रतिनिधी) व एक दुभाषा काश्मिरी मित्र- येऊन उभे राहिलो. आमच्या येण्याची वर्दी दुस-या जिन्याने बहुधा आधीच वर पोचलेली असावी. कारण फार वेळ थांबावे लागले नाही. हिरव्या पडद्याआडून Come in, Come in असा आवाज आला व आम्ही लगेच खोलीत प्रवेश केला. पन्नाशीच्या घरातली, चौरस हाडापेराची एक भारदस्त व्यक्ती मोठ्या लाकडी पलंगावरून कष्टाने उठण्याचा प्रयत्न करीत होती व आम्हाला खुर्चीवर बसण्यास सांगत होती. डोक्याला पट्टी होती. चेहरा काळजीने काळवंडल्यासारखा दिसत होता. काही कुशल प्रश्न झाले, आमच्या समोरच्या खुर्चीवर ती व्यक्ती स्थानापन्न झाली आणि संभाषणाला हळूहळू वेग येऊ लागला. त्या व्यक्तीचे अंग अजूनही ठणकत असावे असे बोलताना सारखे जाणवत होते. अतिशय मवाळ शब्दात, एकही अपशब्द न उच्चारता, खिन्नता दाटलेल्या स्वरात ती व्यक्ती सांगत होती -

 'असे, इतक्या वर्षात कधीही घडले नव्हते. आमच्या वाडवडिलांच्या काळातही नाही. हा सर्व मुसलमान मोहल्ला. आमचे एकच काय ते हिंदू घर. पण कधीच कसला त्रास नाही, तेढ़-संशय नाही. वातावरण पूर्ण विश्वासाचे, एकमेकांना वेळी-अवेळी, उपयोगी पडण्याचे. घरातल्या मुलाबाळांचा, बायकामाणसांचाही सर्वत्र अगदी निःशंक वावर होता, येणे जाणे होते. त्या दिवशी पण, मी सकाळी नेहमीप्रमाणे आमच्या मळ्याकडे निघालो तेव्हा, गावात गेले ८-१५ दिवस गडबड, दंगल चालू होती तरी, मला आपल्या घरादारावर काही संकट येईल अशी मुळीसुद्धा शंका आली नाही. दिवसभर मी मळयातच होतो आणि काम संपल्यावर टांग्यातून मी दुपारी चार-साडेचारच्या सुमारास मोहल्यापर्यंत आलो, तरीही काही कल्पना आली नाही. आम्ही मुलासारखा सांभाळलेला एक मुलगा टांग्यात माझ्याबरोबर होता. घरापासून थोड्या अंतरावर टांगा आला आणि वातावरण बदलल्याचे प्रथमच एकदम जाणवले. कोणी सांगत होते घरावर दगडफेक झाली आहे, पुढे न जाणे चांगले. पण फार विचार करायलाही वेळ मिळाला नाही. टांगा थांबून आम्ही उतरतो आहोत, इतक्यात लहानशा जमावाने आम्हालाच गराडा घातला, डोक्यात काठीचे एकदम तडाखे बसले, कपड्यावरून, अंगावरून रक्त वाहू लागले. हातातले घड्याळ, बोटातली अंगठी, खिशातले पाकीट वगैरे केव्हा लुबाडले गेले ते कळलेच नाही. माझ्या

।। बलसागर ।। ४८