पान:बलसागर (Balsagar).pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिस्त्री एकीकडे ओरडतच होते-माझ्या मुलाचे नाव ' दीनानाथ ' नाही, श्यामसुंदर आहे, तुम्हाला हवा असलेला मुलगा हा नाही. याला नेऊ नका. कोणी त्यांचेकडे लक्ष दिले नाही. शेवटी धीटपणा करून मिस्त्री यांनी विचारले, ‘वॉरंट आहे का ?' सब इन्स्पेक्टर जो खवळला आहे म्हणता ! मुलाबरोबर बापाचीही बकोटी धरून दोघांना ट्रकमध्ये कोंबण्यात आले. श्रीनगरातील राष्ट्रीय विचारसरणीविषयी प्रसिद्ध असणा-या एका नामवंत शाळेच्या संस्थापक-मुख्याध्यापकांची ही अवस्था ! या वेळी हे गृहस्थ रात्रीच्या अध्र्या चड्डीतच होते. त्यांचा चष्मा त्यांना घेऊ दिला नाही, दाताच्या कवळीची तर आठबणच राहिली नाही. बायकोने आणि मुलाबाळांनी ओरडा केला, पण काय उपयोग ? संगिनींची टोके दाखवून आणि धक्काबुक्की करून त्यांची तोंडे बंद करण्यात आली आणि पोलीस चौकीत पोचल्यावर पुढचे धिंडवडे काय कमी होते ! बापाच्या देखत मुलाचे हाल करून मग दोघांचे जाबजबाब घेतले गेले. दोनच्या सुमारास दोघांना एका कोठडीत ढकलण्यात आले–जेथे असेच दहा-बारा दुर्दैवी जीव पूर्वीच अडकवलेले होते. काश्मिरची कडक थंडी, गार फरशी, अंगावर अर्धी चड्डी, रात्रभर लघवीलाही पोलिसांनी बाहेर येऊ दिले नाही. तिथेच कोप-यात घाण, बसल्याबसल्या झोप, आणि बहुतेकजण मिस्त्री यांच्यासारखेच प्रतिष्ठित, सुशिक्षित. दुस-या दिवशी सकाळी त्यांना श्रीनगरच्या तुरुंगात हलविण्यात आले, तेव्हा हायसे वाटले, कारण तेथे बरेच समदु:खी भेटले. कोणी फळे दिली, कोणी कपडे दिले. दुःख सान्यांनी वाटून घेतले की हलके होते, निदान वाटते तरी, नाही का ?

 ‘माणूस प्रतिनिधी' म्हणून मी श्रीनगरात दाखल झालो तेव्हा तेथील वातावरण हे असे जळके आणि जळजळीत होते. धरपकड आणि लपंडाव सुरू होता. चीड, संताप, अविश्वास, संशय, काळजी यांचे साम्राज्य सर्वत्र पसरले होते. साधा टांगेवालाही विचारल्या प्रश्नाच्या उत्तरापेक्षा अधिक बोलेना-कारण ‘ प्रतिनिधी ' ' भारतीय ' दिसत होता-म्हणजेच ' परका ' वाटत होता. टांगेवाले बहुतेक सर्व मसलसान पडले. टॅक्सीतही मोठ्याने बोलण्याची चोरी, कोण कुठे चहाडी करील आणि विनाकारण केव्हा कोठडीची हवा खावी लागेल याचा नेम नव्हता. मोगलाईच ती. काही पत्रकार भेटले. त्रयस्थांच्या भेटीगाठी झाल्या आणि ओळखीच्या एकदोघांना भेटावे म्हटले तर ते भूमिगत , बराच लपंडाव खेळून शेवटी भेट झाली ती एका अड्डयावर. इतरही बरेच कार्यकर्ते तिथे आस-याला वा लपायला आलेले होते. श्रीनगरच्या आसपासच्या भागातूनही वातावरण तापलेले होते. तिथे राहणे असुरक्षित वाटल्याने, किंवा चळवळीत आपणहून भाग घ्यावा म्हणून आलेले, असेही काहीजण त्या घोळक्यात होतेच

।। बलसागर ।। ४५