पान:बलसागर (Balsagar).pdf/42

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सने दिली होती, असे म्हणतात. सादिक-भेटीचा हा वृत्तांत सांगण्यासाठी म्हणून प्रा. मधोक यांनी लडाखला निघण्यापूर्वी दि. २२ च्या संध्याकाळी पंडितांची एक सभा घेतली. या सभेत बोलता बोलता ते एवढेच म्हणाले, ज्यांना या देशाशी प्रामाणिक राहायचे नसेल त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे. प्रा. मधोक यांच्या परिचयातल्या एका पत्रकाराने-जो तेथे उपस्थित होता- मला सांगितले की, यापेक्षा प्रा. मधोक काही जास्त बोलले नाहीत. आता यात चिडण्यासारखे काय आहे ? अशी विधाने तर खुद्द सादिकसाहेबांनीही अनेकदा केलेली आहेत. पण विपर्यास झाला, केला गेला. वार्ता अशा फैलावल्या गेल्या की, प्रा. मधोक यांनी आपल्या भाषणात साच्याच मुसलमानांना काश्मिरातून चालते व्हा म्हणून सांगितले. हे कसे सहन केले जाणार ?
 चोवीस तारखेच्या सकाळपासूनच वातावरणाचा रंग पालटला. कुजबुजणारे घोळके रस्त्याच्या कडेकडेला दिसू लागले, दुकाने बंद ठेवण्यात आली, श्रीनगरच्या वेगवेगळ्या भागांतून लहानमोठ्या मिरवणुका ‘ Bloody Madhok get out' अशा घोषणा देत मुख्य रस्त्याकडे जमू लागल्या. पाच ते तेवीस ऑगस्टपर्यंत पंडित समाज, पोलीस आणि सादिक सरकार या त्रिकोणातच आंदोलन फिरत होते-पण दिनांक चोवीसपासून त्याला वेगळीच-जातीय व हिंदूविरोधी कलाटणी उघडउघड दिली गेल्याचे स्पष्ट दिसत होते. दुपारनंतर जमावाच्या हालचालींना विशेष जोर चढला. गाव कदल, गणपत यार, काला खुद, हबकदल, बाना मोहल्ला, खानका मोहल्ला या हिंदू वस्त्यांवर गुंडांनी चाल करून तेथे बरीच मोडतोड, दगडफक व शिवीगाळ चालू केली. एके ठिकाणी तर शाळा-कॉलेजातून सुटलेल्या मुलींना गुंडांनी अडवले, त्यांचे वरचे कपडे फाडले, घड्याळे व आंगठ्या लुबाडून नेल्या. जमाव हटवण्यासाठी वा गुंडांना पकडण्यासाठी पोलिसांनी कुठेही, काहीही हालचाल केली नाही.
 जमावाचे आणखी एक उद्दिष्टही साध्य झाले. याच दिवशी धनवतीच्या अर्जाची न्यायालयात सुनावणी होणार होती व शक्यता होती की, परमेश्वरीला आपल्या आईच्या स्वाधीन केले गेले असते. १४४ कलम जारी असताना न्यायालयाच्या बाहेर आठ-दहा हजारांचा जमाव कसा जमू शकत होता, हे एक आश्चर्यच आहे. पण काश्मिरात अशी आश्चर्ये नेहमी घडत असतात. जमाव केवळ जमू शकला, त्याची पांगोपांग केली नाही-एवढेच नव्हे, तर त्याच्या मुक्तलीला चालू दिल्या गेल्या. घोषणा–आरडाओरडा, शिवीगाळ इतकी वाढली की, न्यायालयाला आपले काम शेवटी बंद करावे लागले. परमेश्वरी गुलाम रसुलच्या हातून निसटू नये म्हणून केवढा हा आटापिटा !

 आणि सादिकसाहेबांची आवाहने सुरूच होती-शांतता आणि सुव्यवस्था

॥ बलसागर ॥ ३९