पान:बलसागर (Balsagar).pdf/35

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वस्थ होते, कदाचित डोळेझाकही करीत असतील, कोणी सांगावे ? पण दिल्ली ! लाख लाख पलटणी काश्मिरात आणि श्रीनगरात खड्या असताना, गुप्तचरांचे खाते हाताशी असताना, सादिक सरकारलाच काय, प्रत्यक्ष भारतीय शासनालाच हादरा देणा-या एका काळ्या कारस्थानाची गंधवार्ताही दिल्लीपर्यंत पोहोचू नये ? ऑगस्ट-सप्टेंबर हे काश्मिरच्या बाबतीत नेहमीच धोक्याचे महिने आहेत, याची पूर्वानुभवावरून कोणालाही जाणीव असू नये ? परमेश्वरीच्या निमित्ताने, पंडित समाज जो काही आवाज उठवत होता, त्याला काश्मिरच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्त्व आहे, कणाकणाने आणि क्षणाक्षणाने हातातून चाललेल्या काश्मिरची ही एक आर्त हाक आहे, ही कोणालाही ऐकू येऊ नये ! कुणाचेही इकडे लक्ष असू नये ?
 हो. कुणाचेच लक्ष नव्हते हे खरे आहे. सारे कसे शांत होते, थंडगार होते, मजेत होते. वेळीच सावध झाले, तर ते आमचे शासन कसले ? आमचा समाज कसला ?
 वैरी मात्र सावध होता. संधीची वाट पाहत होता.
 संधीही लवकर चालून आली. १५ ऑगस्ट.
 श्रीनगरातील रीगल चौकाला, इतिहासात प्रथमच, या दिवशी निरपराध भारतीय स्त्री-पुरुषांच्या रक्ताचा अभिषेक घडणार होता.

 त्यादिवशी सकाळी-१५ ऑगस्टला श्रीनगरमधील रीगल चौक मुलामाणसांनी, तरुणतरुणींनी, आबालवृद्ध स्त्री-पुरुषांनी नुसता फुलून निघाला होता. मिळणारे चारी रस्ते सारखे वाहत होते. सर्वांच्या मुखातून एकच घोष, एकच गर्जना निघत होती-' भारत भाग्यविधाता,' ' भारतमाता की जय', ' भारता जागा हो', 'भारतीय बांधवांनो, आम्हाला साथ द्या, आम्हाला आपल्याशिवाय कोणाचा आधार आहे !' श्रीनगरात हे नवीन होते, अप्रुुप होते. निदान गेल्या वीस वर्षांत हे शब्द, हा घोष, ही भारताविषयीची आत्मीयता येथल्या वातावरणाला अपरिचित होती. कुणालाही यात आव्हान नव्हते, कुठलाही आक्रमकपणा यात अभिप्रेत नव्हता. होता एक अविचल निर्धार, होती न्यायाची एक साधी सरळ मागणी. श्रीनगरातील भारतीय म्हणवणारे, पण भारतीयत्वाच्या खाणाखुणा पुसून टाकणारे, जवळजवळ स्वतंत्र कारभार करणारे, दिल्लीलाही वेळप्रसंगी झुगारून देणारे शासन आपल्यावर अन्याय करीत आहे, आपले उरलेसुरले अस्तित्वच काश्मिरातून नाहीसे करण्याच्या खटपटीत आहे हे पाहिल्यावर, या श्रीनगरातील पंडित समाजाने दिल्लीला जाग आणण्यासाठी, सा-या भारताचे लक्ष वेधण्यासाठी १५ ऑगस्टच्या सुमुहूर्तावर रीगल चौकाचा-श्रीनगरातील या

।। बलसागर ।। ३२