पान:बलसागर (Balsagar).pdf/34

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाहीत आणि शेवटी गुलाम हसन यांना या जागेवर आणून बसवण्यात आले. जाळे बरोबर पसरले गेले, परमेश्वरीला अधिकच उशीर होऊ लागला, तीन हजारापर्यंत रक्कम तिच्या नावावर बाकी चढली, गुलाम रसूलचे औदार्यही वाढत गेले, त्याच्याही हाती त्याचा नसलेला बराचसा पैसा खेळू लागला. सोबतही रंगू लागली.
 असा जाहीर आरोप गुलाम हसन आणि गुलाम रसूल या कंपनीवर करण्यात आला आहे की, ऑडिट रिपोर्टात गुलाम रसूलकडे अठरा हजार रुपयांची रक्कम येणे बाकी काढण्यात आली, व तेरा हजार रुपये काही चतुर पद्धतीने जमा दाखवून गुलाम हसन यांनी, आपल्या नात्यातल्याच असणा-या गुलाम रसूलची सुटका करून घेतली. जय सरकार ! जय सहकार !

 मुलगी सापडली. गुलाम रसूलच्या ताब्यात ती परत दिली गेली. पोलिसांना वाटले, प्रकरण मिटले. नेहमीचा अनुभवही काही वेगळा नव्हता.
 पण धनवती यावेळी एकटी नव्हती. पोलिसांनाही कल्पना नव्हती की, या वेळचा मामला काही वेगळाच होता. अर्थात् अगोदर कसली काही कल्पना करता आली, तर ते पोलीस कसले?
 ६-७ ऑगस्टलाच निषेधाचे सूर उमटू लागले. काश्मिरातील पंडित समाजाचा असंतोष, त्वेष, राग लहानसहान सभांतून प्रकट होऊ लागला. मुलगी आईला परत मिळावी, फार तर चौकशी पूर्ण होईपर्यंत तिला एखाद्या त्रयस्थाच्या स्वाधीन करावी, एवढीच सुरुवातीची मागणी होती. पण या जोडीला इतरही मागण्या हळूहळू वाढू लागल्या. आंदोलन पसरू लागले. वीस वर्षे दडपला गेलेला आवाज बाहेर पडू लागला. आता किती सहन करायचे ? कायमचे नाहीसे होण्यापूर्वी, एकदा किंकाळी फोडली पाहिजे असा संकल्प आकार घेऊ लागला. कोणी नेता नव्हता, कोणी राजकीय पक्ष नव्हता; पण कोठारच इतके ठासून भरले होते की, एक ठिणगी पुरेशी होती. परमेश्वरी ही ठिणगी ठरली आणि कोठार धुमसू लागले. प्रतिपक्षाला हे अनपेक्षित होते; पण संधी सापडताच पंडितांचा हा आवाज गळयासकट दाबून टाकण्याची कारस्थाने रचली जाऊ लागली. पंडितही मरावा आणि मुख्यमंत्री सादिकही उडावा असे ज्यांना वाटत होते तो मंडळी पुढे सरसावली आणि घाव घालण्याची संधी हुडकू लागली.

 दहा-बारा ऑगस्टपासूनच सभांचे रूपांतर हळूहळू मिरवणुकात होऊ लागले होते. 'भारतभाग्य विधाता,' ‘भारत झिदाबाद', अशा घोषणा देत पंडितांचे लहानमोठे जथे, स्त्री-पुरुषांचे, विद्यार्थी-विद्यार्थिनींचे घोळके, श्रीनगरच्या रस्त्यांतून हिंडू लागले होते. दंगली, रक्तपात झाल्यावर शांततेची आवाहने करणा-या आणि पोकळ फतवे काढणा-या कुणाकुणाचेही याकडे लक्ष जात नव्हते. मुख्यमंत्री सादिक

।। बलसागर ।। ३१