पान:बलसागर (Balsagar).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाला. आपली प्रक्रिया कोण ती ? राम, कृष्ण, बुद्ध, शिवाजी ही परंपरा जो आपली मानतो, असा समाज राष्ट्रीय समाज म्हणून ओळखणे व इतिहासाने त्याच्या म्हणून सिद्ध केलेल्या भूमीशी या समाजाचे स्वामित्वाचे नाते जोडणे; ही परंपरा आपली मानणारा भारतात आज फक्त हिंदू समाजच आहे, म्हणून हिंदुसमाज हा या देशात राष्ट्रीय समाज ठरतो. या समाजाच्या म्हणून मानल्या गेलेल्या 'आसिंधू- सिंधुपर्यन्ता’ भूमीवर इतर कोणत्याही समाजाचा अधिकार पोहोचू शकत नाही. ही आजची वस्तुस्थिती. उद्या इतर समाज या राष्ट्रीय समाजाशी समरस होऊ लागतील, परंपरांची सरमिसळ होऊन ती अधिक समावेशक होईल. ती तशी होण्यासाठी एकत्वाचे, एकात्मतेचे संस्कार व प्रयोग करीत राहण्याची जबाबदारी. या आज राष्ट्रीय म्हणून गणल्या जाणाऱ्या समाजाचीही आहेच; हे सर्व मान्यच. पण तशी परिस्थिती उद्भवल्यावरही, परंपरा अधिक व्यापक व आज तिच्यापासून दूर राहणाऱ्यांना सामावून घेण्याइतकी समावेशक झाली तरी, तेव्हाही या राष्ट्राला 'हिंदुराष्ट्र' म्हणण्यास प्रत्यवाय नसावा; कारण निदान सावरकरांनी तरी 'हिंदू' हा शब्द स्वच्छ राजकीय अर्थानेच योजलेला आहे ! धर्माशी या शब्दाचा सावरकरांनी संबंध जोडलेला नाही. राम-कृष्ण-बुद्ध-शिवाजी ही परंपरा मानणारा व या परंपरेने पुनित झालेल्या आसिंधूसिंधू भूमीशी इमान बाळगणारा तो हिंदू, ही सावरकरांच्या हिदुत्वाची व्याख्या आहे. उद्या या परंपरेत एखादा अकबरही येऊ शकेल. पण तेव्हाही ही परंपरा हिंदू या नामाभिधानाने ओळखण्यास हरकत नाही. 'गंगा' आणि ‘यमुना'चा संगम झाल्यावर पुढे वाहत जाते ती 'गंगा' असते; जरी तिच्यात यमुनेच्या पाण्याचा रंग मिसळलेला असतो. पण जर उद्या सर्वांनाच केवळ हे नावच परंपरासमन्वयाच्या आड येते असे खरोखरच वाटू लागले तर, त्यातही बदल करण्यास हरकत नाही. ही स्वाभाविक उत्क्रांतीही सावरकरांना अमान्य नव्हती. त्यांचा आग्रह होता आशयाचा. कोणती परंपरा या भूमीची बीज परंपरा आहे, हे सिद्ध करण्याचा. एकीकडे हिंदुराष्ट्रवादाचा आग्रहाने पुरस्कार करीत असतानाच, सावरकरांनी हिंदी राष्ट्रवादाचे स्वागत करण्याचीही अगदी प्रारंभापासूनच तयारी ठेवली होती. १९३६-३७ च्या सुमारास 'हिंदी राज्याचे नागरिक सर्वांआधी आम्ही होऊ' ही भूमिका मांडताना सावरकरांनी निःसंदिग्ध शब्दात सांगितले होते--

 “संयुक्त हिंदी राज्याचे स्वप्न, जर पहिल्याने कोणाला पडले असेल, तर ते हिंदूनाच होय. आपल्या त्यागांनी आणि झगड्यांनी ते राज्य कोणी आजच्या व्यवहार्य राजकारणाच्या कक्षेत आणले असेल, तर तेही पुन्हा हिंदुंनीच होय. आपल्या बलाबलाचा योग्य विचार करून, हिंदू हे एक समान नि संयुक्त हिंदी राज्य स्थापण्याच्या हेतूने चाललेल्या या सार्वलौकिक झगड्यात, आपल्या अहिंदूवर्गातील देशबांधवांची सहकारिता मिळविण्याला केव्हाही अनुकूलच होते व आहेत. हिंदुस्थानात आपली

।। बलसागर ।। २४