Jump to content

पान:बलसागर (Balsagar).pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाज. कारण राष्ट्रीय अस्तित्वाची समान ऐतिहासिक स्मृती जतन केलेली आहे फक्त या बहुसंख्य समाजानेच. हेच सरळ सत्य रत्नागिरीहून सुटल्यावर सावरकर प्रतिपादू लागले. कर्णावतीच्या पहिल्याच हिंदुसभा अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी 'द्विराष्ट्रवाद' ही एक वस्तुस्थिती म्हणून दाखविलेली आहे. त्याचे समर्थन किंवा पुरस्कार केलेला नाही. त्यांनी हा धोका म्हणून सांगितला की, आज या क्षणी, या देशात, मुसलमानांचा पाच-सहा कोटी समाज असा आहे की, जो हिंदुस्थानचा समान ऐतिहासिक वारसा नाकारीत आहे; या वारशाशी ते आज समरस झालेले नाहीत व केवळ अल्पसंख्य म्हणूनही येथे सुखाने नांदण्याची त्यांची इच्छा नाही. इतकेच नव्हे, तर हिंदुस्थानात आपण एकेकाळी बहुसंख्य हिंदूंवर राज्य केलेले आहे, ते स्थान पुन्हा आपल्याला मिळाले पाहिजे; अल्पसंख्य म्हणून नव्हे, तर राज्यकर्ते म्हणून या भूमीचा उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे, अशी या (अपवाद वगळता) मुसलमान समाजाची आज धारणा आहे आणि त्या दृष्टीने स्वतंत्र राज्यनिर्मितीचे त्यांचे प्रयत्न ब्रिटिशांच्या मदतीने अव्याहत चालू आहेत. हिंदुसमाजाने हे प्रयत्न हाणून पाडावेत, मुसलमान समाजाच्या अडवणुकीला व धाकदपटशाला भीक न घालता केवळ आपल्या बळावर विसंबून राहावे. कारण यजमान या दृष्टीने या वास्तूच्या, या भूमीच्या मुक्ति भुक्तीची मुख्य जबाबदारी हिंदुचीच आहे. याच समाजाचा या भूमीशी अत्यतिक जिव्हाळ्याचा पिढ्यानुपिढ्यांचा इतिहाससिद्ध ऋणानुबंध आहे.

 हाच तो हिंदुराष्ट्रवाद. मुळात राष्ट्रवाद ही विशिष्ट भूमीवर विशिष्ट समाजाची स्वामित्व प्रस्थापित करू पाहणारी प्रेरणा आहे. या प्रेरणेचा उगम आधुनिक आहे. पारलौकिक निष्ठेचा लोप झाल्यावर ऐहिकाचे अधिष्ठान शोधणाऱ्या युरोपीय समाजाला फ्रेंच तत्त्वज्ञ रूसो याने दिलेली ही देणगी आहे. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जो इहवादी, औद्योगिक व नागर समाज युरोपात उदयास आला, त्याचे हे तत्त्वज्ञान. या नव्या समाजाच्या मूलस्थानी असणारी स्वामित्वाची, संचयाची प्रेरणाच राष्ट्रवादाच्याही मुळाशी असणे स्वाभाविकच आहे. म्हणूनच राष्ट्रवाद हा विशिष्ट भूमीवर विशिष्ट समाजाचे स्वामित्व सिद्ध झाल्यावरच उदयास येऊ शकतो. भूमीचा आणि राष्ट्रवादाचा संबंध अटळ आहे; कारण भूमी हाच स्वामिभावाचा सध्याच्या युगात तरी मुख्य आधार आहे. भूमीइतकी अन्य कशाच्या योगानेही समाजाची स्वामित्वधारणा व्यक्त होऊ शकत नाही. इतिहास, संस्कृती, भाषा आदि समान बंधनांनी जो समाज एकत्व पावलेला असतो, त्याचे विशिष्ट भूमीशी स्वामित्वाचे नाते जोडले जाणे, हीच राष्ट्रनिर्मितीची अखेरची प्रक्रिया आहे. एकत्वाचे सर्व घटक आहेत, समान परंपरा व समान आकांक्षा आहेत, पण भूमी नाही तोपर्यंत ज्यू हे राष्ट्र नाही. पॅलेस्टाईनची भूमी लाभली आणि ज्यू-राष्ट्राचा जन्म

।। बलसागर ।। २३