Jump to content

पान:बलसागर (Balsagar).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सेना, ४५ चे नाविक बंड, हे सारे सशस्त्र क्रांतियुद्धातलेच टप्पे होते, हे नाकारण्यात काही अर्थ नाही. इतकेच काय, अहिंसक म्हणवणाऱ्या काँग्रेसने जे आंदोलन ४२ मध्ये केले, ते अहिंसक तर नव्हतेच, निःशस्त्रही नव्हते, तर चक्क भूमिगत, सशस्त्र क्रांतिकारक व दहशतवादी मार्गाचा अवलंब यात केला गेला, हेही कोणी नाकारू शकणार नाही. तरीही ज्यांना भारतात ' सशस्त्र क्रांती ' झालीच नाही, भारताला अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले असे म्हणावयाचे असेल, ते खुशाल तसे म्हणोत. इतिहास या दोन्ही मार्गाचे अस्तित्व सिद्ध करील, फारकतीबद्दल दोन्ही मार्गाच्या अध्वर्युना दोषही देईल, श्रेयाची विभागणीही यथान्याय करील.
 आणि या मार्गाचे एवढे यशापयश नक्की झाले की, सावरकरांचे यातील स्थान हा वादातीत विषय आहे. ते तर क्रांतिकारकांचे मुकुटमणीच. ते आणि त्यांचा क्रांतिकारक पक्ष - सत्तावन ते सुभाष ही सारी परंपरा - म्हणजे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एक गौरवशाली पर्व आहे, जे सुवर्णाक्षरांनीच लिहावे लागेल, लिहिले जाईल.
राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया

 १९३८ चे सावरकर ही १९०८ च्या सावरकरांची परिणती होती. ज्या देशस्वातंत्र्यासाठी १९०८ चे सावरकर झुंजत होते, तो देश कोणाचा, त्याची अस्मिता कोणती, हे मूलभूत प्रश्न राजकारणाच्या विचित्र वळणामुळे तेव्हा निर्माण होऊन बसले होते. जो जो या देशात राहतो, तो तो या देशावर स्वामित्व सांगू शकतो काय ? घरात किडेमुंगी, पोपटमैना, नोकरचाकर, पैपाहुणा ते थेट यजमान हे सर्वजण कमीजास्त काल राहतच असतात. पण घर कोणाचे हा प्रश्न उपस्थित झाला, तर बोट कोणाकडे दाखवायचे ? अगदी पिढ्या दोन पिढ्या राहिला तरी नोकर तो नोकरच आणि पाहुण्याने बराच काळ मुक्काम ठोकला तरी तो काही यजमान ठरू शकत नाही. यजमानाला हे यजमानपद अर्थातच परंपरेने आलेले असते. केव्हातरी हजारपाचशे वर्षांपूर्वी, यजमानाच्या पूर्वजांनी या वास्तूवर स्वामित्व मिळविलेले असते. त्यानंतरच्या पिढ्यानपिढ्यांनी या वास्तूचा उपभोग घेतलेला असतो. वेळप्रसंगी वास्तुच्या संरक्षणासाठी शेजाऱ्यापाजाऱ्यांशी व परक्यांशी संघर्ष खेळलेले असतात. तिच्या संवर्धनासाठी आपले तनमनधन अर्पण केलेले असते. अशा सर्व असंख्य पूर्वस्मृती त्या वास्तूबरोबरच त्या यजमानाकडे आलेल्या असतात आणि हा स्मृतींचा वारसा हीच त्याच्या यजमानपदाची मूळ कसोटी राहते. हा वारसा जे आज बाळगून आहेत, ते या देशाचे पुत्र, स्वामी, मूळ घटक. ज्यांच्याजवळ हा वारसा आज नाही, ते अल्पसंख्य, इतरेजन. नागरिकत्वाचे समान अधिकार, विकासाची समान संधी या अल्पसंख्याकांनाही येथे मिळेलच. पण हे राष्ट्र हिंदूंचे, हिंदुसमाज हा येथील राष्ट्रीय

।।बलसागर ।। २२