मग पाकिस्तानचे सैनिकी बळ खच्ची करण्याचे आपले उद्दिष्ट साध्य झाले या म्हणण्याला आधार काय ? साधनसामग्रीची हानी पुन्हा लगेच भरून काढता येईल. मनुष्यहानी दहशत बसावी एवढी मोठी नाही आणि पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी जिरली म्हणावी तर तेही नाही ! (भुत्तो-आयुब अजूनही ताठ आहेत ! ) -मग हे आपले समाधान काल्पनिकच नाही का ? बळ खच्ची झाले असते तर पाकिस्तानने युद्धबंदी स्वीकारल्यावरही एक हजारांपेक्षा अधिक वेळा युद्धबंदीभंग केला असता ? बळ खच्ची झाले असते तर युद्धबंदी अंमलात असतानाच राजस्थान भागातील आपली ठाणी परत हिसकावून घेतली असती? भारताच्या ताब्यात पाकिस्तानचा सातशे मैलांचा प्रदेश आहे, तर पाकिस्तानने भारताचा सोळाशे मैलांचा मुलुख काबीज केला आहे, असे दर्शविणारे नकाशे दिल्लीतील पाकिस्तान हायकमिशनतर्फे सर्रास वाटले जात आहेत, अशी वार्ता आहे. ही खरी असेल तर, हे काय पाकिस्तानची खोड मोडल्याचे लक्षण आहे ?
'आक्रमणाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी लष्करी बळ खच्ची करणे' हे साध्यच फसवे, अर्धवट व चुकीचे आहे हा याचा निष्कर्ष आहे. साध्य मर्यादित असायला हरकत नाही, पण ते सुस्पष्ट हवे, नेमके हवे. जे नकाशावर स्वच्छपणे दाखविता येईल असे हवे. 'कुठल्यातरी एका क्षेत्रात शत्रूचा निर्णायक पराभव' हेच उद्दिष्ट हवे होते. आक्रमणाचा कायमचा बंदोबस्त सवाई आक्रमणानेच होऊ शकतो, मर्यादित प्रतिकाराने नव्हे. लाहोर आज भारतीय सेनेच्या हाती हवे होते किंवा पूर्व पाकिस्तानवर दिल्लीची हुकमत प्रस्थापित व्हायला हवी होती. निदान पाकव्याप्त काश्मिर तरी मुक्त करायचा ? यांपैकी एखादीतरी गोष्ट घडून यायला हवी होती आणि मग शास्त्रीजींनी वाटाघाटींसाठी कुठेही जाण्यात मौज होती, शोभा होती, दिमाख होता. आज ताश्कंदला निघाली आहे ती केवळ अगतिकता आहे, निव्वळ असहाय्यता आहे, भीड आहे, दडपण आहे, दुर्बलता आहे.
आणि एखादे विजयाचे हुकमी पान हाती ठेवणे, पाकिस्तानचा एखाद्या ठिकाणी, एखाद्या क्षेत्रात निर्णायक पराभव करून युद्धविरामाच्या वाटाघाटींना बसणे अशक्य होते का ? मुळीच नाही. आपण सर्वदृष्ट्या पाकिस्तानच्या चौपट मोठे आहोत. हे जमले नसते तरच नवल. पण घाई झाली, नेतृत्व कुठेतरी कमी पडले, हेच खरे. दोष लष्कराकडे जात नाही. राजकीय नेतृत्वाकडेच जातो. लष्करातील काही अनुभवी व्यक्ती तर सांगतही आहेत की, युद्ध अचानक थांबविण्यात आपली चूक झाली. मेजर जनरल थोरात यांपैकी एक आहेत. परवाच पुण्याचे कॅप्टन जठार म्हणाले की, युद्ध अद्याप दहा दिवस तरी अधिक चाला-