पान:बलसागर (Balsagar).pdf/20

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'पाकिस्तानची तसूभरही भूमी आम्हाला नको आहे; पाकिस्तानी आक्रमणाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पाकिस्तानचे सैनिकी बळ (Military Power) खच्ची करणे, एवढाच मर्यादित उद्देश डोळ्यासमोर ठेवून भारतीय फौजांनी पाकिस्तानी प्रदेशात आगेकूच केली', असे आपल्याला सांगण्यात आले. ठीक आहे. हा हेतू साध्य झाला का, एवढाच प्रश्न प्रथम विचारात घेऊ.

 सैनिकी बळ दोन प्रकारचे. साधनसामग्री आणि मनुष्यशक्ती. साधनसामग्रीबाबत एवढे जरूर म्हणता येईल की, पॅटन टॅक्स आणि सेबर जेट्समुळे पाकिस्तानला जी एकप्रकारची अभेद्यता वाटत होती तिला आपण तडाखा देऊ शकलो. पण यामुळे पाकिस्तान नरमले, याला पुरावा काय ? पाकिस्तान शस्त्रास्त्रांच्या बाबतीत संपूर्णतया परकीय मदतीवर अवलंबून आहे. पाकिस्तानात शस्त्रास्त्रांचे कारखाने चालू असते आणि ते आपण उध्वस्त करून पुरवठा बंद पाडला असता, तर पाकिस्तानला तडाखा जाणवला असता. कारखाने सुरू होऊन पुन्हा शस्त्रास्त्रांचा साठा जमा व्हायला दहा-पंधरा वर्षांचा कालावधी लागतो आणि अशा परिस्थितीत व एवढ्या कालापुरतेच पाकिस्तानचे लष्करी वळ खच्ची झाले आहे, असे समजून चालणे रास्त ठरले असते. पण परकीय मदतीचा ओघ पाकिस्तानकडे कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकतो. सेबर जेट्स आणि पॅटन टॅक्स निरुपयोगी ठरतात असे आढळून आल्यास आणखी काही प्रकार येतील, एवढाच फरक. मदतरूपाने, कर्ज म्हणून किंवा खरेदी करून पाकिस्तान आपले शस्त्रास्त्रांचे कोठार अल्पावधीत भरून काढील यात शंका घेण्याचे कारण नाही. अगदी भारत-पाक युद्ध चालू असतानाही तुर्कस्थानची लष्करी मदत पाकिस्तानकडे सुरूच होती. पाकिस्तानचा उघड उघड पराभव होऊ देणे इंग्लंड-अमेरिका किंवा रशिया-चीन यांपैकी कोणालाच मानवणारे नसल्याने एक नाही दुसरा, हा नाही तो, कोणीतरी पाकिस्तानला मदतीचा हात नेहमीच पुढे करीत राहणार, हेही आपण विसरून उपयोगी नाही. अशा परिस्थितीत आपण पाकिस्तानच्या लष्करी सामथ्र्याचा कणा मोडला हे समाधान बरेचसे काल्पनिकच ठरण्याचा संभव अधिक.

 दुसरा मुद्दा मनुष्यहानीचा. याबाबत आपल्या बाजूची हानी कमी लेखन चालणार नाही. अद्याप मृतांच्या आणि बेपत्ता सैनिकांच्या याद्या प्रसिद्ध होतच आहेत. आपला अधिकारीवर्ग प्रमाणाबाहेर गारद झाला ही बाब तर विशेष चिता करण्यासारखी आहे. एवढे तर नक्की की, पुन्हा डोके वर काढता येणार नाही एवढी मोठी पाकिस्तानची मनुष्यहानी तर आम्ही करू शकलेलो नाही.

।। बलसागर ।। १५