राष्ट्रवाद ही आजच्या काळातली सर्वांत प्रभावी अशी शक्ती ठरलेली आहे; परंतु मूठभरांच्या वर्तुळातच बंदिस्त राहिली तर ती पराभूतही ठरते असा सर्व ठिकाणचा अनुभवही आहे. अखेरच्या माणसापर्यंत ती पोचली पाहिजे, समाजातल्या सर्व वर्गाना, वर्णाना, धर्मपंथांना, विभागांना तिचा स्पर्श व्हायला हवा. आपल्याकडील हिंदी आणि हिंदू हे दोन्ही राष्ट्रवाद या कामी आजवर अपुरे पडले; म्हणून एवढी प्रदीर्घ सांस्कृतिक परंपरा आणि निसर्गसमृद्ध असा प्रचंड भूभाग असूनही आपला राष्ट्रवाद अद्याप पराभूत वाटतो; तो आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होत नाही. राष्ट्रवाद आणि सामाजिक-आर्थिक व सांस्कृतिक समतावाद या दोन प्रेरणांचा मिलाफ आणि योग्य समन्वय घडून आल्याशिवाय ही आत्मनिर्भरता, हे स्वावलंबी राष्ट्रजीवन उभे राहूही शकणार नाही. 'बलसागर भारत' हे स्वप्न तोवर अपुरेच राहील.
गेल्या सुमारे वीस वर्षांत देशामध्ये घडलेल्या काही ठळक राजकीय, सामाजिक घटनांवरील भाष्ये श्री. ग. मां. नी 'साप्ताहिक माणूस' मध्ये वेळोवेळी नोंदली, त्यापैकी निवडक 'बलसागर'मध्ये एकत्र आली आहेत. विविध विचारधारांना खुल्या मनाने लेखक येथे सामोरा जात आहे. त्यांचं सुस्पष्ट व तर्कसंगत विश्लेषण येथे आहे आणि आजच्या संदर्भात भारतीय राष्ट्रवादाची नवी मांडणी करण्याचा प्रयत्नही आहे. राष्ट्रवादी भूमिकेतून नवी क्षितिजे शोधणाऱ्या सर्वांना म्हणूनच हे पुस्तक वाचावेसे वाटेल. त्यातील प्रतिपादनावर, मांडणीवर विचार करावासा वाटेल.