पान:बलसागर (Balsagar).pdf/165

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांचा परस्परांशी मेळ घालत घालत शेवटी मोक्ष-मुक्तीच्या आद्य जीवनप्रेरणेशी त्या जोडून द्यायच्या, त्यांचे हळूहळू उदात्तीकरण साधणारी जीवनाची क्रमबद्ध मांडणी करायची, हे हिंदुजीवनपद्धतीचे वैशिष्ट्य आहे व एकात्म मानववाद म्हणजे वेगळे काही विचारधन नसून या प्राचीन पद्धतीचे व परंपरेचे युगानुकूल असे नवे संस्करण मात्र आहे. श्री. गोळवलकरगुरुजी यांनी वेगळ्या शब्दात हे वैशिष्ट्य असे सांगितलेले आहे. गुरुजी म्हणतात -

 "आमची प्रकृती कोणती ? भौतिकतेचा परमोच्च विचार ठेवूनही त्याहून भिन्न असे जे आहे त्याचा साक्षात्कार आम्हाला झालेला आहे. आम्ही समाजालाही त्याच दृष्टीतून पाहिले आहे. त्यातूनच सुखलाभ होणार आहे. विकासासाठी प्रत्येक व्यक्तीतील गुणावगुण पाहून त्याच्यासाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

 प्रत्येक व्यक्तीला स्वत:च्या पावलाने जाता येईल अशी पात्रता उत्पन्न करणे आणि त्या मार्गाने चालताना ती स्वास्थ्यलाभ घेऊ शकेल, हा विचार करून आमच्या समाजाची रचना झाली आहे. त्याला स्थायी स्वरूप प्राप्त व्हावे, याचसाठी शासनसत्तेची निर्मिती केली गेली...."

 यात माणूस व समाज आपल्याला हवे तसे आपले जीवन घडवू शकतो, आपला विकासक्रम ठरवू शकतो, समाज विकास प्रक्रियेची दिशा, गती यावर योग्य ते नियंत्रण ठेवू शकतो, असे एक अध्याहृत गृहीतकृत्य आहे. उलट मार्क्सवाद किंवा एकूण भांडवलशाही-समाजवादी तत्त्वज्ञाने ऐतिहासिक अपरिहार्यता अटळ मानतात . समाजव्यवस्था बदलण्याची, नवी घडवण्याची विशिष्ट वाटच माणसाला उपलब्ध आहे, ती वाट निवडण्याचे, वेगळ्या वाटा चोखाळण्याचे स्वातंत्र्य माणसाला नाही असे मानतात व एकात्म मानववादासारखे विचार आदर्शवादी-स्वप्नाळू म्हणून निकाली काढतात. म्हणजे हा प्रश्न पुन्हा नियती विरुद्ध माणूस या सनातन प्रश्नाशी भिडतो. माणूस नियती बदलू शकतो, तो स्वतंत्र आहे, आपले जीवनाकार घडवण्याचे विशिष्ट मर्यादेत त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे, नव्हे तसे त्याने ते सतत घडवत राहिले पाहिजेत; जुने टाकून देत, नवे आकृतिबंध रचत अखेर पूर्ण स्वातंत्र्याचा, मुक्तीचा अनुभव घेणे हेच मानवी जीवनाचे साफल्य आहे, अशी एकात्म मानववादाची धारणा आहे. ही धारणा खरी की, ऐतिहासिक अपरिहार्यता खरी याचा निकाल अर्थातच केवळ पुस्तकात लागणार नाही. आपण रशिया-चीनपेक्षा येथील मानवी विकासाचा काही वेगळा घाट निर्माण करू शकलो तर एकात्म मानववाद हे केवळ स्वप्नरंजन नसून एक जितेजागते तत्वज्ञान आहे हे आपोआपच सिद्ध होणार आहे.

।। बलसागर ।। १६६