पान:बलसागर (Balsagar).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेपूट लपविण्यासाठी सर्वांच्या धड शेपटांना कमी ठरवण्याचा हा उद्योग अजबच म्हटला पाहिजे. देशात एक बोलणारे आणि परदेशात जाऊन दुसरेच ठरवून येणारे ‘पराभूत मनोवृत्तीचे ' व 'न्यूनगंडाने पछाडलेले' की, 'जे बोलता ते खरे करून दाखवा, त्यासाठी पडेल ती किंमत द्यायला, हवा तो त्याग करायला देश तुमच्यामागे उभा आहे', असे कंटशोष करून ओरडणारे विरोधक 'पराभूत मनोवृत्तीचे?,' 'न्यूनगंडाने पछाडलेले' ? यशवंतरावांचा राजकीय बचावाचा हा आक्रमक पवित्रा त्यांच्या मुत्सद्देगिरीवर प्रकाश टाकणारा असला, तरी सत्य त्यामुळे लपणार नाही. शास्त्रीजींनीच हे सत्य हैद्राबादच्या आपल्या भाषणात सांगून टाकले आहे. पाकिस्तानशी युद्ध करण्याची कल्पनाच मला अशक्यप्राय वाटते. इतर कोणत्याही देशाशी होणाऱ्या युद्धापेक्षा पाकिस्तानशी होणारे युद्ध हे अधिक भयंकर आणि गुंतागुंतीचे झाले असते. शास्त्रीजींचे हे उद्गार पुरेसे बोलके आहेत. पराभूत कोण आणि खंबीर कोण याचा यावरून कोणालाही चटकन् बोध होऊ शकेल.
 पाटण्याच्या आपल्या भाषणात यशवंतराव पुढे असेही म्हणाले की, "जगात आज सर्वत्र एक शांततावादी देश म्हणून भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे. याउलट एक ‘मारका बैल' म्हणून पाकिस्तानची जगात नाचक्की झालेली आहे; तेव्हा विरोधकांनी एखादा करमणुकीचा कार्यक्रम चालू असल्याच्या सुरात सरकारवर टीका करू नये." आपण कोण हे जाणून घेण्यासाठी इतरांची ज्यांना मदत घ्यावीशी वाटते, आपल्याविषयी जग काय बोलते याकडे ज्यांचे सारखे लक्ष असते, अशा व्यक्ती न्यूनगंडाने पछाडलेल्या व पराभूत मनोवृत्तीच्या असतात, अशी माहिती मानसशास्त्रावरच्या प्राथमिक पुस्तकात सापडते. कच्छकराराच्या विरोधकांना वाटते- 'जग आपल्याला काय वाटेल ते म्हणो; आपल्या स्वाभिमानाला धक्का पोहोचेल, आपल्या राष्ट्रीय स्वार्थाला बाधा येईल, असे काहीही राज्यकर्त्यांनी करू नये. देशातील पौरुष आणि स्वाभिमान जागृत असणे, हे जागतिक कीर्तीच्या बुडबुड्यांपेक्षा अधिक महत्त्वाचे व मोलाचे आहे. परदेशी कोडकौतुकापेक्षा आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा' असे सांगणारे विरोधक 'न्यूनगंडाने पछाडलेले' की, मौंटबॅटन-विल्सन इत्यादींची गोरी कातडी पाहून विरघळणारे व आपल्या प्रदेशावर पाणी सोडायला तयार होणारे आमचे राज्यकर्ते 'न्यूनगंडाने पछाडलेले', याचा निर्णय आता आमच्या ‘साहेबांनी'च करावा.

 आणि ‘ भारताची प्रतिष्ठा फार वाढली', ही यशवंतरावांची समजूत तरी कितपत खरी आहे ? कच्छ आक्रमणाचे वेळी पाकिस्तानने अमेरिकन रणगाड्यांचा वापर केला आपल्या वैमानिकांनी जीव धोक्यात घालून हे सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा केले. अमेरिकेने पाकिस्तानच्या निषेधाचा एक शब्द तरी उच्चारला !

।। बलसागर ।। ११