पान:बलसागर (Balsagar).pdf/158

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनमोकळे आणि चांगल्या रहाणीमानात रस असलेले वाटले. जपान्यांसारखच चिन्यांनाही निसर्गाचे वेड आहे . त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची आवड आहे. आम्ही ज्या ठिकाणी रहात होतो तेथे किंवा अन्य ठिकाणीही दूरान्वयाने देखील माओच्या तत्त्वज्ञानाने आमचे 'ब्रेन-वॉशिंग' करण्याचा प्रयत्न केला गेला नाही किंवा चीनच्या पुरातन संस्कृतीच्या बढायाही कुणी मारल्या नाहीत. माझे सहकारी जे व्यवसायाने प्रकाशक होते ते चीनमधील प्रकाशकांशी संपर्क साधण्यात गुंतले होते. मी मात्र चीनमधील रस्त्यांवरील देखावे पाहण्यात गर्क होतो. भारतासारखेच चीनमधील रस्तेही माणसांनी भरून वाहात असतात. उलट भारतापेक्षा चीनमधील रस्त्यांवर माणसांची गर्दी जास्तच वाटली. आम्ही ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या त्या त्या ठिकाणी माणसांच्या समुद्रातून वाट काढावी लागत होती. लहान-थोर, तरुण-वृद्ध हातात हात घालून, हसत-खिदळत, कधी आइस्क्रीम खात किंवा रस्त्यातून सरबत किंवा कोला पिताना दृष्टीस पडत असत. सर्वांचे वेष जवळजवळ सारखेच होते. पॅन्ट आणि कोट, बहुधा निळया, हिरव्या गडद रंगाचा. बायका आणि पुरुषांचे वेष सारखेच असल्याने ओळखता येणे कठीण जात होते. चेहरेपट्टीवरून किंवा केसांच्या ठेवणीवरून ओळखणे भाग पडायचे. मला सर्वात प्रकर्षाने काय जाणवले असेल तर श्रीमंती आणि गरिबी असे परस्पर विरोधी दृश्य मला कुठेही दिसले नाही. मी खूप प्रयत्न करूनही पंधरा दिवसात मला एकही भिकारी कुठे दिसला नाही ! भुकेले चेहरे आणि कृश शरीरे जशी कुठे आढळली नाहीत तसेच श्रीमंती आणि भपकेबाज कपडे केलेली माणसेही कुठे दिसली नाहीत. आपल्या देशात मात्र हे दृश्य सर्रास दिसते, ही जाणीव झाली. अर्थात मी जे पाहिले ते सर्व वरवरचे होते. त्यांची आंतरिक दुःखे काय आहेत हे कळण्यास काही मार्ग नव्हता ; पण एक गोष्ट स्पष्ट दिसली की, अशी जरी काही वैयक्तिक दुःखे असली तरी ती घरी ठेवून ते बाहेर पडले असावेत. कुणा परदेशीय माणसाला दाखविण्यासाठी मुद्दाम आयोजित केलेली ही दृश्ये नव्हती, तर ती नेहमीचीच होती.

 : सिनेमाची पोस्टर्स, नाटकाच्या जाहिराती किंवा नृत्याच्या जाहिरातीत कुठेही अश्लीलता किंवा उघड्या अंगाचे प्रदर्शन दिसले नाही. तरुण मुले-मुली जरी खेळकर आनंदी दिसली तरी सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणे, मिठ्या मारून प्रेम व्यक्त करणे असे जे प्रकार पाश्चिमात्य देशात नेहमी पाहायला मिळतात ते चीनमध्ये कुठेही दिसले नाहीत. मी जगातील अनेक देशांना भेटी दिल्या आहेत; परंतु चिनी स्त्रियांइतक्या आकर्षक स्त्रिया मला कुठेही आढळल्या नाहीत आणि ते सुद्धा फॅशनेबल कपडे, दागिने किंवा स्नोपावडरी किंवा इतर सौंदर्य प्रसाधने न वापरता ! चिनी स्त्रिया नुसत्याच आकर्षक नाहीत

।। बलसागर ।। १५९