पान:बलसागर (Balsagar).pdf/153

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. हा अंतःप्रवाह कधी खंडित झाला असेल, पराभूतही ठरला असेल; पण इजिप्त किवा ग्रीसप्रमाणे पूर्ण नामशेष असा कधीही झालेला नाही. हा प्रवाह मुख्यतः आणि मूलत: हिंदू प्रवाह आहे आणि हाच येथील एकात्मतेचा, राष्ट्रीयत्वाचा मूलाधार आहे. इंग्रजांनी प्रादेशिक-भौगोलिक ऐक्य आणले हे हिंदुत्ववादी नाकारीत नाहीत. या मुख्य प्रवाहाला अनेक उपप्रवाह येऊन मिळाले आहेत, हीही वस्तुस्थिती आहे; पण गंगा-यमुनांचा संगम झाला तर पुढे वाहात जाणाऱ्या प्रवाहाला गंगानदीच म्हणतात. तसे इतर भिन्नभिन्न प्रवाह मुख्य प्रवाहाला मिळाले तरी प्रवाहाचे मूळ हिंदूस्वरूप बदलत नाही. चंद्रशेखरांना व इतर भारतयात्रिकांना आढळून आलेला राष्ट्रीय एकात्मतेचा प्रवाह ही काही अचानक उद्भवलेली राजापूरची गंगा नाही. तो असलाच तर भगीरथाच्या काळापासून वाहात आलेला आहे, हिंदू म्हणवणाऱ्यांनी तो वाहात राहावा, नामशेष होऊ नये म्हणून आपली जीवने यासाठी सांडलेली आहेत, वेचलेली आहेत. म्हणून मवाळीग्रणींचा केवळ प्रादेशिकतेवर आधारित हिंदी राष्ट्रवाद व डाव्यांचा-साम्यवाद्यांचा उपखंडवाद हे दोन्हीही अनैतिहासिक राष्ट्रवाद आहेत. हिंदुत्व हेच येथील राष्ट्रजीवनाचे पर्याप्त वर्णन आहे. ख्रिस्ती धर्ममार्तडांनी गॅलिलियोचा खूप छळ केला. छळाला कंटाळून त्याने पृथ्वी ही बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे स्थिर आहे अशी कबुलीही दिली; पण शेवटी हळू आवाजात तो म्हणालाच, "मी काय करू ? ती फिरतेच आहे." तसे निवडणूक-मार्तडांनी आपल्याकडे चालवले आहे. ख्रिश्चनांची आणि मुस्लिमांची मते मिळावीत म्हणून 'लब्धप्रकाश-इतिहास -निसर्गमाना' वर आधारलेला राष्ट्रवादाचा मूळ सिद्धांतच ते नाकारीत आहेत. तिकडे धर्ममार्तडांचे जे झाले तेच इकडे या निवडणूकमार्तडांचे होणार आहे. काळच त्यांना खोटे ठरवणार आहे. भारत-यात्रिकांना एकात्मतेचा अनुभव जर खरोखरच येत असेल तर या अनुभवाच्या मुळाशी, तळाशी जाण्याचा त्यांनी शक्यतो लवकर व प्रामाणिकपणे अवश्य प्रयत्न करावा. भारत म्हणा, राष्ट्रीय एकात्मता म्हणा, हिंदुत्व म्हणा - मूळ एकच आहे- इंग्रज आणि मुसलमान या देशात येण्यापूर्वीही जे होते ते. देवाण-घेवाण, सरमिसळ झाली हे नक्कीच; पण गाभा, बीजस्वरूप टिकले; ते टिकवून ठेवण्यासाठी पिढ्यानुपिढ्यांनी आपले रक्त सांडले म्हणून ! असे रक्त वाहिले नसते तर चंद्रशेखरादी यात्रिकांना जो भारतीय एकात्मतेचा अनुभव आला तो आलाच नसता ! चंद्रशेखर ज्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालले आहेत त्या जयप्रकाशांनाही शेवटी शेवटी हे सत्य जाणवले. 'कुछ बात है ऐसी' जी आम्हाला एकत्र बांधून ठेवते आहे, असे त्यांनी बिहारमधील, अगदी एका

।। बलसागर ।। १५४