पान:बलसागर (Balsagar).pdf/152

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जवळ नाही. ही उणीव लाटांनी भरून निघते असा आजवरचा अनुभव आहे. अशी एखादी लोकोत्साहाची लाट निर्माण करण्याचाही हा प्रयत्न असण्याची शक्यता आहे. या यात्रेसोबत असलेले पुण्याचे भाई वैद्य यांची या यात्रेसंबंधीची वार्तापत्रे साधना-मराठवाडा या वृत्तपत्रातून आलेली आहेत. तामिळनाडूतील एका घोषणेचा उल्लेख एका वार्तापत्रात करण्यास ते विसरलेले नाहीत. वैद्यांनी लिहिले आहे, "भारत यात्रेत घोषणा देताना तमिळ तरुण एम्. जी. आर.ला (तामिळनाडूचे चित्रपट अभिनेते,-मुख्यमंत्री) कोपरखळी मारत असत. ट्विंकल, ट्विंकल लिटर स्टार.... चंद्रशेखर सुपर स्टार !" अशा उल्लेखांवरून तरी वाटते, की 'भारताचा शोध' एवढाच काही या यात्रेचा आंतरहेतु नसावा ! वाट दिल्लीला जाणारी आहे. वाटसरू पुण्यास येत आहेत, त्यांचे स्वागत असो !

 प्रांतभेद, भाषाभेद, उत्तर-दक्षिण वाद, पक्षभेद वगैरे असले तरी भारतीय एकात्मतेचा अनुभवही यात्रिकांना ठिकठिकाणी येतो आहे. भाई वैद्यांनी आपल्या वार्तापत्रात लिहिले आहे; "तरीही भारत यात्रेच्या काळात या गोष्टीची पक्की खात्री झाली की, प्रादेशिक अभिमानाच्या आड राष्ट्रीय अभिमानाचा निर्मळ प्रवाह झुळझळ वाहात आहे. त्याची कित्येक प्रत्यंतरे मिळाली." ही प्रत्यंतरे पाहता यातील एकही न-हिंदू नाही, हे वार्तापत्रांवरूनच दिसते आहे. हा राष्ट्रीय अभिमानाचा वारसा मग आला कुठून ? भारतीय एकात्मता जर आज अस्तित्वात असेल तर नक्कीच ती गेल्या शे-दोनशे वर्षांपूर्वीही होती. तत्पूर्वीपासूनही चालत आलेली असणार; पण हे मान्य केले तर राष्ट्रवादाचा काँग्रेसी व डावा साम्यवादी सिद्धान्त सोडून द्यावा लागतो, त्याचं काय ? काँग्रेसच्या प्रारंभीच्या काळात तिच्यावर मवाळांचे, नेमस्तांचे वर्चस्व होते. रेल्वेमुळे, पोस्टामुळे, इंग्रजी शिक्षणामुळे आणि एकछत्री अंमलामुळे येथे राष्ट्रभावना निर्माण झाली, इंग्रजी राज्यामुळे भारतात राष्ट्रवाद आला, हा देश इंग्रजांमुळे एक झाला असे या मवाळाग्रणींचे मत होते व हेच मत पुढे गांधीनेहरूच्या काळापर्यंत व आजही, न तपासता सर्वत्र रूढ झाले. उलट, येथील डावे व विशेषतः साम्यवादी, भारत हा एक उपखंड आहे, हा एक देश - हे एक राष्ट्र नाहीच, येथे अनेक भाषिक राष्ट्रे आहेत असे प्रतिपादन करीत असतात. ही दोन्ही टोके अनैतिहासिक ठरवून येथील हिंदुत्ववाद्यांनी प्रथमच असे ठामपणे सांगितले की, इंग्रज येथे येण्यापूर्वीही, गेली सुमारे पाच हजार वर्षे तरी या देशात एक राष्ट्रीय समाज अस्तित्वात आहे, एक राष्ट्रजीवन येथे विकसित होत आहे, येथे एकात्मतेचा अंत:प्रवाह कधी प्रकटपणे, कधी सुप्तपणे वाहात आलेला

।। बलसागर ।। १५३