पान:बलसागर (Balsagar).pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रुपये वर्षाकाठी खर्ची पडत आहेत. सैन्य अडकून राहिले आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताची बदनामी चालूच आहे. 'सैन्याला पाठलाग थांबवण्याचा हकूम दिला गेला ती चूक झाली. सैन्यबलाच्या जोरावर काश्मिरप्रश्न त्याचवेळी निकालात काढला असता तर बरे झाले असते, असे, इतरांप्रमाणे माझेही त्यावेळी मत होते-' अशा आशयाचे उद्गार श्रीमती इंदिरा गांधींनी चारसहा महिन्यांपूर्वी न्यूयॉर्क येथे काढले होते. पण मागाहून बोलून काय उपयोग ! वेळ एकदा निघून गेली ती गेलीच.
 नुकतीच घडलेली कारगिलची कथा अशीच. ही पाकिस्तानी ठाणी भारतीय जवानांनी मोठ्या शर्थीचा पराक्रम करून जिंकून घेतली. पुन्हा आम्ही यूनो निरीक्षकांवर भरवसा टाकून ठाणी परत करण्यास तयार ! हे यूनो निरीक्षक काश्मिर युद्धबंदीरेषेवर इतकी वर्षे आहेतच. त्यांची कितीशी पत्रास पाकिस्तानने बाळगली आहे ? या निरीक्षकांच्या डोळ्यांदेखत पाकिस्तानने अनेकदा गोळीबार केले. या गोळीबारांची झळ निरीक्षकांनाही काही वेळा लागली, तरी पाकिस्तानची दांडगाई कमी नाही. आणि यू. नो. च्या आश्वासनांवर विसंबून कारगिलची ठाणी सोडायची होती, तर एवढा आटापिटा करून ती जिंकून घेण्याची तरी काय गरज होती ! जवानांचा सारा पराक्रम मातीमोलच झाला म्हणायचा ! अशा परिस्थितीत ती मरणोत्तर वीरचक्रे आणि गौरवपदके हा सारा पोकळ व अर्थशून्य देखावा वाटू लागतो. एकीकडे रणगीतांचा देशावर भडीमार आणि दुसरीकडे रणशूरांच्या पराक्रमाचे हे खच्चीकरण ! राज्यकर्त्यांच्या हेतूविषयी संशय यावा, अशीच ही विरोधी वस्तुस्थिती आहे.
 कच्छबावत वाटाघाटींचे गुऱ्हाळ आता सुरू होईल, तेव्हा सैन्याने मिळविलेले राज्यकर्त्यांनी किती राखले ते कळून येईलच. पण सकृद्दर्शनी तरी ' पाकिस्तानचा दरोडा' पचलेला दिसतो. कच्छसीमेबाबत कोणताही आणि कसलाही वाद नाही, ही भारताची मूळ भूमिका आज सुटलेली आहे. सरदार ठाणे व बियारबेट ही आमचीच ठाणी आम्ही खाली केली आहेत. कच्छमधील आमच्या मुलखातून पाकिस्तानने बेकायदा बांधलेल्या सोळा मैल रस्त्याचा वापर करण्यास पाकिस्तानला मुभा दिली गेली आहे. हा रस्ता पाकिस्तान बांधीत - होते, तेव्हा आमचे राज्यकर्ते काय करीत होते ? अक्साई-चीनमधून चीन रस्ता बांधीत असताना जे केले तेच. त्यावेळी नेहरू-मेनन होते. यावेळी शास्त्री-चव्हाण आहेत इतकाच फरक. माणसे बदलली तरी गाफीलपणा कमी झाला नाही.
 अशी सारी वस्तुस्थिती असता पाटण्याच्या सभेत संरक्षणमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांनी विरोधकांना व कच्छ कराराच्या टीकाकारांना पराभूत मनोवृत्तीचे', 'न्यूनगंडाने पछाडलेले' अशी दूषणे दिलेली आहेत. आपले तुटलेले


।। बलसागर ।। १०