पान:बलसागर (Balsagar).pdf/148

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समानार्थक असतील तर एक सोडावा आणि दुसरा पत्करावा असा तरी आग्रह का असावा ? दोन्हींचा वापर चालू रहावा हेच अधिक उचित व आजवरच्या परंपरेला, प्रथेला धरून होणार नाही का ? रा. स्व. संघाने ही भूमिका घेतलेली आहे व सद्यःस्थितीत ती चुकीची आहे असे म्हणता येणार नाही. पुढे जाऊन सरसंघचालक बाळासाहेब देवरस आपल्या अलीकडेच झालेल्या नागपूरच्या विजयादशमी उत्सवातील भाषणात असेही म्हणाले आहेत की, बहुसंख्यांक असलेल्या हिंदूना या देशात जातीय व संकुचित ठरवणे हा या समाजाचा घोर अपमानच आहे. यावरून 'हिंदू' शब्द राजकारण्यांना अडचणीचा वाटतो आहे म्हणून टाकून देण्याचा संघाचा मुळीच विचार नाही हे स्पष्ट होते. ज्यावेळी राजकारणात वावरणारे लोकही हिंदू, हिंदी, भारतीय हे शब्द पूर्वीप्रमाणे समानार्थक म्हणून सरसहा वापरू लागतील, या शब्दावरचा बहिष्कार मागे घेतील तेव्हाच हा प्रश्न कायमचा सुटणार आहे. बदल उभयपक्षी हवा. संघाने बदलावे असे ज्यांना मनापासून वाटते त्यांनीही आपले जुने समज -गैरसमज तपासून घ्यायला नकोत का ? कशासाठी गेली साठ वर्षे हा 'संघयज्ञ' चालू आहे हे विरोधकांनी, टीकाकारांनीही आता नीट जाणून घ्यायला हवे. हिंदू, भारतीय हे शब्द संघ समानार्थक मानतो अशी सरसंघचालकांनी निःसंदिग्ध घोषणा केलेली आहे. तसे प्रत्यक्ष आचरणही संघाकडून घडत आहे. मोर्वीतील पूरग्रस्तांना साहाय्य असो की, केरळातील संघ शाखांची बांधणी असो; जो राष्ट्रनिष्ठ, देशाविषयी आत्मीयता असणारा, तो आपला अशी संघाची वागणूक लख्ख आहे. मग संघाने या देशाला 'हिंदुराष्ट्र' म्हटले म्हणून बिघडले कोठे ?

 अर्थात हिंदुराष्ट्र म्हणा, भारत म्हणा किंवा उद्या आणखी काही एखादे नामांतर होऊ द्या; वस्तुस्थिती बदलत नाही; प्रश्न कायमच राहतात. हे राष्ट्र ज्यांना मोठे व्हावे असे वाटते त्यांना केवळ शब्दांचे वाद खेळून समाधान पावता येणार नाही. राष्ट्र मोठे कसे करायचे हा मुख्य सवाल आहे व याचे उत्तर पूर्वीच्या चुका उगाळत बसून किंवा केवळ आपल्या जुन्या परंपरेत वरचेवर बुड्या मारून सापडणे शक्य नाही. आज हे राष्ट्र गरीब आहे. येथे संपन्नतेचे युग कसे येईल ? आज हे राष्ट्र विषमतेने ग्रासलेले आहे. येथे समता कशी स्थापन करता येईल ? आज येथे राष्ट्रीय चारित्र्याचा अभाव आहे. हा कसा दूर करता येईल ? परकीय बड्या राष्ट्रांची दडपण वाढत आहेत, अमेरिकन संस्कृतीचे न कळत, कळत अनुकरण होत आहे. भारतीय आदर्शाचा लोप सुरू आहे. हे सांस्कृतिक, आर्थिक आक्रमण कसे थोपवून धरायचे ? देशात विघटनवादी प्रवृत्तींनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यांना

।। बलसागर ।। १४९