पान:बलसागर (Balsagar).pdf/147

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अरविंदांच्या लिखाणात हा शब्द सहजगत्या आलेला आहे; पण हळूहळू हिंदू संघटित व समर्थ होऊ लागला, जशास तसे वागू लागला, सतत मार खात राहण्याचे तो नाकारू लागला, तेव्हापासून एक प्रकारची संकुचिततेची भावना या शब्दाला चिकटली व नवराष्ट्रनिर्मितीला ही भावना अडचणीची ठरते असे वातावरण तयार होऊ लागले. बहुसंख्याकांचे राष्ट्र म्हणजे हिंदुराष्ट्र हा सरळसाधा अर्थ मागे पडून 'अल्पसंख्यांकांची हद्दपारी' या अर्थाने या शब्दाकडे पाहिले जाऊ लागले व 'हिंदुस्थान हिंदूओंका, नही किसी के बापका' या हिंदू संघटनावाद्यांच्या घोषणेमुळे हा अर्थ अधिकच पक्का होऊन बसला. वास्तविक 'हसके लिया पाकिस्तान, लढके लेंगे हिंदुस्थान' या द्विराष्ट्रवादी घोषणेची 'हिंदुस्थान हिंदुओका' हो घोषणा स्वाभाविक प्रतिक्रिया होती. ती तेवढ्यापुरती, चळवळीतील भावनोद्रेक म्हणूनच खरी होती. आक्रमक अल्पसंख्याकांना दिलेले ते उत्तर होते. मूळ हिंदुराष्ट्रवादी मांडणीमध्ये अल्पसंख्याकांचे सर्व लोकशाही हक्क सुरक्षित आहेत अशीच भूमिका घेतली गेलेली होती. संयुक्त, समान हिंदी राज्य हेच हिंदुराष्ट्राचे ध्येय आहे अशी स्पष्ट घोषणा सावरकरांच्या गाजलेल्या अहमदाबादच्या अध्यक्षीय भाषणात करण्यात आलेली होती. पण चळवळीच्या काळात मूळ भूमिका सहसा पाहिल्या जात नाहीत तसेच याही बाबतीत घडले व हिंदुराष्ट्रवाद म्हणजे मुसलमानांना, इतर अल्पसंख्याकांना हद्दपार करू म्हणणाऱ्यांचा राष्ट्रवाद असा समज रूढ झाला व अल्पसंख्याकांच्या मतांवर सत्तेचे नवे राजकारण उभे करणाऱ्या सर्वांच्या तो पथ्यावर पडणारा असल्याने, तो दूर करण्याची कुणी तसदी घेईनासा झाला. स्वातंत्र्यानंतर समतेचे वारे देशात वाहू लागले. हिंदू म्हणजे चातुर्वण्य मानणारा समाज असा एक नवा अर्थ पूर्वीच्या मुस्लिम विरोधी अर्थाला चिकटला व आज मुस्लिमविरोध व दलितविरोध असे दोन अर्थ 'हिंदू' या संज्ञेला चिकटलेले असल्याने हा शब्द उच्चारायला जो तो बिचकत आहे. आपण संकुचित ठरू या भयाने बहुतेक लोक या शब्दाचा वापर करण्याचे टाळत आहेत. वास्तविक हिंदुत्ववादी चळवळीत चातुर्वण्य मानणारे गोळवलकर गुरुजी होते तसेच चातुर्वण्यावर हल्ला करणारे सावरकरही होते. असे भेद हिंदी राष्ट्रवादी चळवळीतही होतेच. गांधीजी चातुर्वण्य मानत होते तर नेहरू, सुभाष आधुनिक समाजवादी विचारसरणीचा प्रसार करणारे; पण आशय दोन्हीकडचा सारखा असूनही 'हिंदीभारतीय' राष्ट्रवाद संकुचित ठरला नाही; हिंदुराष्ट्रवादाभोवती मात्र वर्णवर्चस्वाच्या, मुस्लिमविरोधाच्या भिंती रचल्या गेल्या, संकुचिततेची एक तप्तमुद्रा या शब्दावर कायमची ठोकली गेली. इतकी की, अटलबिहारी वाजपेयींसारखे पूर्वाश्रमीचे जनसंघवादी नेतेही 'हिंदू' शब्दाऐवजी 'भारतीय' शब्द वापरावा असे सुचवू लागले. प्रश्न असा आहे की, हिंदू आणि भारतीय हे दोन्ही शब्द

।। बलसागर ।। १४८