पान:बलसागर (Balsagar).pdf/146

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केवळ खोड राहत नाही, त्याला पानाफुलांचा बहर येतो, फळे येऊन ते वाकते किंवा वादळवाऱ्याने झोडपले जाऊन ते कोसळते, तसेच लोकांचे, समाजाचेही होत असते. असे हे होत राहणे म्हणजेच भूगोलाचे-प्रदेशाचे संस्कृतीकरण होणे, जनावरांची माणसे होणे. यादृष्टीने पाहता 'हिंदू' ही संज्ञा मूळ भौगोलिक-प्रादेशिक खरी; पण हजारपाचशे वर्षानंतर आपोआपच ही संज्ञा केवळ भूभागापुरती लागू न राहता व्यापक होत गेली, या भूभागातील लोकांच्या धर्म संस्कृतीला, कलाकौशल्याला, इतिहासपुराणांना उद्देशूनही हा शब्द, 'हिंदू' ही संज्ञा वापरली जाऊ लागली. हा सर्व अर्थाचा-आशयाचा व्यापक विस्तार ध्यानात घेऊनच सावरकरांनी आपल्या 'हिंदू' या शब्दाच्या व्याख्येत 'पितृभू' आणि 'पुण्यभू' अशी जोडशब्दांची योजना केली. 'हिंदू' कुणाला म्हणावे ? जो पिढ्यानपिढ्या या भूभागात नांदत आला, म्हणजे ज्याची 'पितृभू' हा विशिष्ट भूभाग आहे तो माणूस, तो समाज हे तर उघडच आहे; पण हा झाला केवळ भूगोल. पिढ्यान पिढ्या एकत्र नांदल्यामुळे या माणसाने, या समाजाने एक संस्कृतीविशेषही निर्माण केला, तोही ध्यानात घ्यायला हवा. म्हणून 'पितृभू'ला ' पुण्यभू'ची जोड सावरकरांनी दिलेली आहे. 'हिंदू' हा शब्द अशा तऱ्हेने केवळ भूभागापुरताच मर्यादित न राहता, धर्मसंस्कृती, कलाकौशल्यकलापालाही उद्देशून वापरला जाऊ लागला. जमिनीप्रमाणेच तो आकाशालाही भिडला, शरीराप्रमाणेच मनोबुद्धींनाही व्यापून तो उरू लागला. असे प्रत्येक समाजाचे होत असते, यात अस्वाभाविक, अनैसर्गिक असे काहीही नाही. सवयीने, परंपरेने एखादा शब्द रूढ होतो, त्याभोवती लोकजीवन संघटिन-विघटित होत राहते, संस्कृतींचे उत्कर्षापकर्षही अशा शब्दांशी जोडले जातात. असे जर आहे-असते तर 'हिंदू' शब्दावरूनच एवढे वादळ का ? 'हिंदी' हा शब्द चालू शकतो. 'जयहिंद' ही घोषणा लोकप्रिय ठरू शकते. यावरून निघालेला 'इंडियन' हा शब्द तर फॅशनेबलसुद्धा आहे. मग 'हिंदू' हा शब्द उच्चारल्यावरच एकदम दचकायला का व्हावे ? ब्रिटन आणि इंग्लंड हे दोन शब्द सर्रास वापरले जाऊ शकतात. यातील एका शब्दाचा त्याग करा असे कुणी म्हणत नाही. मग 'हिंदू' हा शब्द सोडा आणि 'भारतीय' हा शब्द वापरा असा अट्टाहास कशासाठी ? दोन्हींचा सहज स्वीकार आणि वापर आपल्याकडे का होऊ शकत नाही ?

 'हिंदू' म्हणजे एक भोंगळ आणि भित्रा प्राणी अशी जोवर स्थिती होती तोवर या शब्दाला फारसे कुणी बिचकत नव्हते. सरसहा तो प्रचारात होता, आधुनिक भारताची पायाभरणी करणारे थोरथोर नेतेही आपल्या लिखाणात, बोलण्यात या देशाला 'हिंदुराष्ट्र' असे म्हणत होते. टिळकांच्या, विवेकानंदांच्या,

।। बलसागर ।। १४७