पान:बलसागर (Balsagar).pdf/142

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणत. व्यक्तिव्यक्तीला आपापल्या संकुचित कुंडातून, वैयक्तिक-कौटुंबिक-व्यावसायिक-राजकीय कोषातून बाहेर खेचून, निदान काही काळापुरते तरी या राष्ट्रजीवनप्रवाहाचे तिला दर्शन घडवणे, तिचा 'स्व'व्यापक 'स्व'शी जोडणे, व्यष्टीला समष्टीशी जुळविणे, यासाठी दैनंदिन शाखा असत व आहेत. त्यांच्याबद्दलचा संघाचा पराकाष्ठेचा आग्रह पहिल्यापासून आजतागायत यासाठीच कायमही राहिला आहे. हा आग्रह ढिला झाला तर राष्ट्रजीवनाची जाणीव बौद्धिक किंवा वैचारिक पातळीवरच राहण्याचा धोका होता, जशी आज समाजवादी जाणिवांची स्थिती झाली आहे तशी राष्ट्र जाणीवेचीही झाली असती. विचारांनी सगळेच समाजवादी; पण आचरणाच्या नावाने महापूज्य ! जेवढा अधिक समाजवादी तेवढा अधिक स्वत:पुरते पाहणारा, सत्ता-संपत्तीकेंद्राच्या अवतीभवती अधिक घुटमळणारा अशी सद्य:स्थिती आहे आणि याचे एक कारण विचारांना, बौद्धिक मतांना दैनंदिन संस्कारांची बैठकच आग्रहपूर्वक दिली गेली नाही. ही बैठक हिंदुराष्ट्रविचारांना संघामुळे लाभली म्हणून तो केवळ टिकून आहे इतकेच नव्हे, तर वर्धमानही आहे, नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची धमक व ईर्षाही अंत:करणात बाळगून आहे. जमिनीचा गेलेला तुकडा, दोन-अडीच प्रांत-विभाग परत मिळणे, न मिळणे, ही या विचारआचारांची फक्त एक मधली, तात्कालिक स्थिती आहे. अखंडत्वाची सांस्कृतिक जाणीव महत्त्वाची आहे व 'संघटनेसाठी संघटना' या संघसूत्राचा नेमका अर्थ, पिढ्यानपिढ्या ही जाणीव व्यक्ती-व्यक्तीच्या अंतःकरणात सतत तेवत ठेवण्याची व्यवस्था, हा आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत संघ सामील झाला नाही. हेडगेवार असते तर कदाचित हे घडून आलेही असते. गुरुजींचे निवृत्ति-प्रधान विचारविश्व आड आले असण्याचीही शक्यता आहे. दुसऱ्या स्वातंत्र्याच्या चळवळीत, जयप्रकाश आंदोलनात मात्र संघाने उडी घेतली. पण ही उडी घेतली याचा अर्थ मूळ समाजजाणिवेचा प्रवाह वाढता-विस्तारता ठेवण्याचे आपले जन्मदत्त कार्य सोडून संघ सत्तेच्या दैनंदिन उलाढालीत गुरफटायला तयार झाला असा नाही. जाणिवेचे विशालीकरण करण्याचे मूळ कार्य चालू ठेवून परिस्थितीप्रमाणे, कालमानाचा अंदाज घेऊन व स्वसामर्थ्याला पेलवतील एवढी तात्कालिक, निकडीची कामे करीत राहणे संघ वर्ज्य मानीत नाही, गुरुजींच्या काळातही मानत नव्हता. अगदी कुष्ठरोग निवारणाचे बाबा आमटे यांच्यासारखे कार्यही रायपूर भागात गुरुजींनी सुरू करून दिल्याचे आपल्याला आज दिसते याचा अर्थ काय होतो ? तेथील कुष्ठरोगी, आश्रमाची जमीन पिकवण्यासाठी व वसाहतीला उपयोगी पडावा म्हणून एक 'माधव सागर' तेथे स्वश्रमावर तयार करीत आहेत. एव्हाना हा तलाव तयार झालाही असावा. ही केवढी पुरुषार्थ जागवणारी घटना आहे ? अशी विकासकार्ये, चळवळी

।। बलसागर ।। १४३