पान:बलसागर (Balsagar).pdf/141

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वामी आणि विद्याविनयसंपन्न करून आध्यात्मिकतेच्या साक्षात्काराने राष्ट्र आणि विश्व यांच्या सेवेत तत्पर, अनिकेत आणि अपरिग्रही बनवू शकू, तेव्हा आम्हाला अभिप्रेत असलेला एकात्म मानव साकार होईल."

 जावडेकरांचा यती, गांधी-विनोबांचा लोकसेवक, संघाचा अपरिग्रही, अनिकेत स्वयंसेवक-प्रचारक... भारतीय समाजवादप्रस्थापनेची अखंड भारत संस्थापनेची ही वाट आहे-हा मार्ग आहे. कळेल त्याला कळेल. नाही त्यांनी खुशाल म्हणत लिहीत राहावे,...'झोत' टाकावेत..."संघ म्हणजे एक जुनाट व बुरसटलेली शक्ती आहे" वगैरे वगैरे...

 अखंड भारत ही कल्पना म्हणजे जमिनीचा- प्रदेशाचा गेलेला एखादा तुकडा एखाददुसरा प्रांत परत मिळविणे, एवढी संकुचित असती तर बेळगाव-कारवारच्या प्रश्नाइतकीच, गेल्या तीस वर्षात, एखाद्या मागणीची अवकळा तिला आली असती. ही कल्पना म्हणजे कुणी तरी कुणाकडे केलेली मागणी नाही किंवा कुणावरचे आक्रमणही नाही. हे एक समाजदर्शन आहे, एका राष्ट्रीय साक्षात्कारातून (Vision) समूर्त झालेले. हिंदू समाजाच्या स्वरूपाबद्दलची ही एक आत्मश्रद्धा, आत्मजाणीव आहे. किमान गेली पाच हजार वर्षे येथे एक संस्कृतिप्रवाह अखंडपणे वाहात आलेला आहे. या प्रवाहात विक्षेप आले, तो काही काळ विकृत किवा लुप्त झाला, त्यावर आक्रमणे झाली, तरी तो मूळ स्वरूपात वाहत ठेवण्याचे प्रयत्नही अव्याहत होत राहिले, पुढेही होत राहतील. या प्रवाहाशी ज्यांनी ज्यांनी शत्रुत्व केले ते ते अखेरीस या प्रवाहात समाविष्ट होऊन नाममात्रच अस्तित्वात राहिले, प्रवाह पुढे वाहत-गातच राहिला, अशी या 'अखंड' शब्दामागील एक विशाल व ऐतिहासिक आत्मजाणीव आहे. ही जाणीव हा हिंदुराष्ट्रवादाचा मूलाधार आहे आणि म्हणूनच इतकी उपेक्षा, इतका तिरस्कार, टीका आणि विरोध होऊनही हा वाद, हा विचार दबला नाही, मेला नाही, यापुढे तर मरण्याची सुतराम शक्यता नाही. संघस्थापनेमागेही ही जाणीव कशी होती हे स्वा. सावरकरांनी एका प्रसंगी फार मोजक्या शब्दात सांगितलेले आहे. १९३९ मध्ये संघाच्या पुणे शाखेच्या गुरुपौर्णिमा उत्सवात सावरकरांचे मुख्य भाषण झाले. या भाषणात ते म्हणाले, "हिंदुत्वाच्या अथांग सागरावर संकल्पविकल्प, पक्षोपपक्ष, जयापजय यांच्या कितीही लाटा आदळून गेल्या तरी, हा सागर, आहे तसाच, कायम आहे. ही गोष्ट या संघाचे आद्यप्रणेते डॉ. हेडगेवार यांच्या लक्षात येऊन त्यांनी या संघाची प्राणप्रतिष्ठा केली"...हेडगेवारांचीच ही हिंदुत्वाच्या विशाल सागराची कल्पना गंगौघ स्वरूपात गोळवलकरगुरुजी आपल्या बौद्धिकातून स्वयंसेवकांच्या काना-मनावर ठसवत-बिबवत असत, यालाच ते राष्ट्रजीवनाचा 'संस्कार'

।। बलसागर ।। १४२