पान:बलसागर (Balsagar).pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यंत्रणा यांचे स्थापन झालेले आहे व व्यक्तीची उपक्रमशीलता, समाजाचे स्वयंप्रेरित चलनवलन या वर्चस्वामुळे, या निर्णायक प्रभुत्वामुळे गोठून गेलेले आहे. मध्ययुगात धर्मसंस्थांनी व्यक्ति जीवन गुलाम केले. आज तोच वारसा राज्यसंस्था चालवीत आहे. सर्व समाज शासनावलंबी म्हणजेच पुन्हा परावलंबीच आहे. शासनयंत्रणा हीच आज मध्ययुगातील धर्मसंस्थेप्रमाणे एक प्रचंड शोषणयंत्रणा होऊन बसलेली आहे व या शोषणयंत्रणेबद्दलचा असंतोष जगभर वाढीस लागत आहे. १९६७ मधले फ्रान्सचे विद्यार्थी उठाव हा या असंतोषाचाच एक उद्रेक होता. 'भांडवलशहांप्रमाणेच नोकरशहांचीही आतडी खाबाखांबांवर लोंबलेली आम्हाला पाहायची आहेत', अशी विद्यार्थीनेत्यांची घोषणा या उठावात होती, यावरून या नव्या शोषणयंत्रणेबद्दलचा राग किती खोलवर साठत–साचत येतो आहे हे सहज ध्यानात येऊ शकते. फ्रान्सचे अनुकरण नंतर पूर्व व पश्चिम युरोपात, अमेरिकेत, जपान - आशियामध्येही मोठ्या प्रमाणात झाले. किंबहुना ६७ हे वर्ष जगभर विद्यार्थीआंदोलनांनी गाजवून सोडलेले होते व आपल्याकडेही या लाटा धडकू लागलेल्या होत्या. जयप्रकाशांना या लाटांचे आवाज ऐकू येणे हेही स्वाभाविक होते. कारण ते त्याच मार्गाने प्रवास करीत होते. राजकारण सोडल्यावर ते भूदानाकडे वळले ते केवळ दहा-पाच हजार एकर जमीन वाटण्यासाठी नव्हे. तिसरी नैतिक शक्ती समाजात जागृत करणे हा त्यांचा उद्देश होता. विद्यार्थ्यांची उद्रकशक्ती व जयप्रकाशांची नैतिक शक्ती यांचा योग्य वेळी संगम होऊन नवनिर्माण आंदोलन आपल्याकडे गुजराथ–बिहारमध्ये उभे राहिले व क्रमाक्रमाने ते विकसितही होत गेले. बिहारमध्ये प्रतिसरकारे स्थापन होऊ लागली तेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी पुकारली व जनशक्ती व राजशक्ती या दोन शक्तींची टक्कर होऊन राजशक्ती पराभूत झाली. जयप्रकाशांच्या या ऐतिहासिक कार्यात संघानेही त्यांना मनःपूर्वक साथ दिली. कारण जयप्रकाश ज्या मार्गाच्या शोधात आहेत व होते तो मार्ग संघाला अपरिचित नव्हता. नवीनही नव्हता. समाजाची स्वयंशक्ती जागृत व संघटित करणे, या शक्तीच्या बळावर समाजातील भिन्न-भिन्न शक्तिकेंद्रांवर वचक ठेवणे, त्यांचे विरोध अधिकारातिक्रमणे मोडून काढणे, याद्वारे विकेंद्रित समाजजीवनाचा भारतीय आदर्श साकार करणे, असा संघाचा प्रवास आहे व यासाठी किमान संघटन हवे म्हणून दैनंदिन संघशाखांचा उपक्रम आहे. आचार्य जावडेकरांना अभिप्रेत असलेला आधुनिक यतीवर्ग हे संघाचे, विशेषत: गोळवलकर गुरुजींचे भारतीय समाजकारणाला फार मौलिक योगदान आहे व या एका भूमिकेबाबत तर गांधीजी आणि गुरुजी फारच जवळ असल्याचे आपल्याला दिसेल. काँग्रेसचे विसर्जन करून लोकसेवासंघात तिचे रूपांतर करावे असा गांधींचा निर्णय प्रकट झाल्यावर अगदी उत्स्फूर्त असे या निर्णयाचे स्वागत व त्याचा उचित शब्दात गौरवही

।। बलसागर ।। १३९