पान:बलसागर (Balsagar).pdf/134

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संघस्वयंसेवकांनी अवश्य विचारात घेण्याजोगा आहे. विशेषतः नव्या मूल्यांची जाण हवी, हा बेडेकरांचा आग्रह योग्यच आहे. केवळ राष्ट्रवाद, केवळ प्रामाणिक व नेकीचे आचरण पुरेसे नाही हे कोणीही मान्य करील. पण प्रश्न असा येथेही उपस्थित होऊ शकतो की, बेडेकरांनी तरी ही जाण काही चिकटवलेल्या वाक्यांपलिकडे कुठे व्यक्त केली आहे? त्यांचेही एकूण प्रतिपादन जुन्या मार्क्सवादी चौकटीत अगदी घट्ट ठाकूनठोकून बसविलेले आहे, अडकून बसलेले आहे. हे प्रतिपादन आजवर, निदान हिंदुस्थानात तरी फारसे बरोबर ठरत आलेले नाही. बेडेकर इतिहासाच्या रणांगणाचा उल्लेख करतात . ही रणांगणे बहुधा दूरची, बाहेरची असावीत. कारण आपल्याकडील रणांगणांवर तरी वर्गीय संघटनांचा, विचारसरणीचा आजवर पराभवच होत आलेला आहे. विशेषतः येथील मध्यमवर्गीय समाजजीवनाची ( शहरातल्या व खेड्यातल्याही ) या वर्गीय विचारकांनी व राजकीय कार्यकर्त्यांनी जी उपेक्षा केली, जो तिरस्कार केला, तो या पराभवाला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरलेला आहे, हे बेडेकरांसारख्या तरुण मार्क्सवाद्यांनी तरी ध्यानात घ्यायला हवे. मध्यमवर्गाचे म्हणून जे दोष नेहमी दाखविले जातात ते समाजाच्या इतर घटकातही असतात, आहेत. आणि असले-नसले तरी या वर्गाची परंपरागत व नवी ताकद विचारात घ्यायला हवी. अगदी अर्थव्यवस्थेतील या वर्गाच्या स्थानाचा, मोक्याच्या जागेचा तात्पुरता, व्यूहात्मक विचार करायचा ठरवले, तरी ही ताकद, प्रस्थापिताला अडवण्याची ही कुवत या वर्गाजवळ आहे, ती वाढते आहे, हे मान्य करावे लागेल. बँका बंद पडल्या तर प्रस्थापित हादरेल की, दहा-पाच गिरण्यामधील संपामुळे ? आणि बँक कर्मचाऱ्यांना कामगार म्हणणे, गरीब किसान, शेतमजुरांच्या वर्गात त्यांना बसविणे ही या शब्दाची अगदी थट्टा आहे. मध्यम वर्ग हे काही साचलेले एखादे तळे किंवा डबके नाही. विज्ञानाच्या प्रगतीमुळे नव्या नव्या उद्योग तंत्रामुळे त्याची अंतर्गत रचना, घटना यात सारखे बदल घडत आहेत. तंत्रज्ञ, सेवाक्षेत्रातील व प्रशासनातील घटकांचे प्रमाण व ताकद समाजजीवनात यापुढे वाढत जाणार आहे. तेव्हा संघस्वयंसेवक 'मध्यमवर्गीय' आहेत म्हणून त्यांचा अटळ पराभव निदान मी काही गृहीत धरू शकत नाही. तसेच कोणत्याही एका वर्गाकडे क्रांतीचा, समाजपरिवर्तनाचा मक्ता सोपविणेही मला योग्य वाटत नाही. येथील नव्वद टक्के जनतेला सरसकट एका वर्गात, एका गाठोड्यात कोंबून डाव्या क्रांतीचा उठाव, हेही एक स्वप्नरंजनच आहे. नव्वद टक्के जनतेच्या हिताशी नाते जोडणे मात्र महत्वाचे, मूलभूत. एवढाच बेडेकरांचा आग्रह असेल तर त्याविषयी दुमत नाही. हे जोडण्यासाठी राष्ट्रवादाच्या तरफेचा उपयोग होईल असा आमच्यासारख्यांचा

।। बलसागर ।। १३३