पान:बलसागर (Balsagar).pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुळे भ्रष्ट व्यक्तीच स्पर्धेत हळूहळू पुढे येत राहतात, अधःपात वाढत जातो. ही प्रवृत्ती रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय अगदी क्रांतिकारक सत्ताधाऱ्यांनाही वेळोवेळी योजावे लागतात. स्टॅलिनला शुद्धीकरणाच्या मोहिमा काढाव्या लागल्या. माओला सांस्कृतिक क्रांतीचा धक्का द्यावा लागला. पण सत्ताधाऱ्यांनीच या मोहिमा, हे धक्कातंत्र वापरण्यातही धोका असतो. सत्तेचे केन्द्रीकरण अधिकच वाढते. म्हणून हे कार्य विकेन्द्रित पद्धतीने व्हावे असा लोकसेवक पर्यायामागील विचार आहे. लोकसेवकाने दंडहीन असावे, पण दंडहीनता म्हणजे शक्तिहीनता नाही. निदान गांधीजींच्या कल्पनेतला लोकसेवक तरी शक्तिहीन नव्हता. तो फक्त दिल्ली-मुंबईत राहण्यापेक्षा खेडोपाडी, विखुरलेल्या पण असंघटित नव्हे, अशा अवस्थेत राहावा अशी त्यांची कल्पना होती. त्याने किंवा अशा संघटनेने ग्रामस्वराज्याचे काम करावे अशी त्यांची अपेक्षा होती. सत्तेच्या अटळ केंद्रीकरणाला पायबंद घालण्याचा हा एक त्यांचा प्रयत्न होता. वर्ग आणि विषमता असल्याने हा प्रयत्न फसला, केवळ वर्गविहीन समाजातच हा आदर्श अस्तित्वात येऊ शकेल हे बेडेकरांचे म्हणणे बरोबर नाही. वर्गविहीन समाज रशियात आहे हे खरे असेल, तर तेथे का सत्तेचे अधिकाधिक केन्द्रीकरण सुरू आहे ? का तेथे धंदेवाईक राजकारणी, नोकरशहा सत्तेच्या यंत्रावर आपला ताबा अधिकाधिक जमवीत आहेत ? तेथे लोकसेवकत्वाची गांधीजींनी मांडलेली कल्पना मुळापासूनच अस्तित्वात नव्हती, त्या देशातील सत्तांतरे, चळवळी यांचा ढाचाच वेगळा आहे, हे यामागील कारण आहे. आणि विषमता, वर्गविग्रह आहेत म्हणून तर लोकसेवकांची खरी समाजालाही गरज आहे. ही सामाजिक दु:खे संपली तर हवा कशाला तो लोकसेवक ? जो तो आपले दु:खनिवारण करून घ्यायला समर्थच होईल. आज ही दु:खे आहेत म्हणून लोकसेवकाची गरज आहे. फक्त एक दु:ख नाहीसे करताना दुसरे, पहिल्यापेक्षाही भयानक दु:ख मानगुटीवर बसू नये, म्हणून हा विकेंद्रित पर्याय पुढे मांडलेला आहे. सत्तेच्या अटळ तर्कशास्त्राला दिलेला हा एक छेद आहे. हा परंपरेने हिंदुस्थानात चालतही आलेला आहे. गुरुजींच्या निधनानिमित्त लिहिलेल्या लेखात मी तो पुन्हा मांडला एवढेच. आचार्य जावडेकरांनीही यासंबंधी पूर्वी लिहिलेले आहे.

 ( २ ) या अपेक्षा संघाकडून पूर्ण होऊ शकतील की नाही हा प्रश्न अगदी वेगळा आहे व त्याचे खरे, निर्णायक उत्तर संघाला प्रत्यक्ष कृतीनेच, आज नाही उद्या द्यावे लागणार आहे. मी याबाबत काही लिहिणे, विधाने करणे तितकेसे बरोबर ठरणार नाही. बेडेकर जो मार्क्सवादी वर्गसिद्धांत मानतात त्यानुरोधाने त्यांनी केलेले संघाच्या असमर्थतेबद्दलचे विवेचन ठीकच आहे. ते नवीनही नाही पण अगदी टाकावूही नाही. काही भाग त्यातला

।। बलसागर ।। १३२