पान:बलसागर (Balsagar).pdf/132

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'उदासीन', शासनसत्तेचे महत्व व मर्म न ओळखणारे म्हणू शकतो का ? गांधीजी आणि उदासीनता ही तर दोन टोके आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत राजसत्तेवर अंकुश चालविण्याची, जनतेची आत्मशती जागृत करण्याची, यासाठी अहिंसक पर्यायांचा शोध घेण्याची या महात्म्याची धडपड थक्क करून सोडणारी आहे. या 'अलिप्त' लोकसेवकांनी राजसत्तेचे महत्त्व, तिचे गुंतागुंतीचे, प्रस्थापितात गुंतलेले स्वरूप पूर्णपणे ध्यानात घेतले इतकेच नव्हे, तर राजसत्तेच्या मर्यादाही त्यांनी ओळखलेल्या होत्या. 'शासनसत्ता ही समाजाच्या वर, पलिकडे अशी काही असते' असे त्यांनी मानलेले दिसत नाही. असे असते तर गोळवलकरगुरुजी रामकृष्ण आश्रमात होते तेथेच राहिले असते; गांधीजींनी विधायक कार्याचा पसारा आणखीही वाढविला असता. पण दोघेही शेवटपर्यंत राजसत्तेशी कधी विरोधी, कधी सहकारी संबंध ठेवून होते आणि तरीही 'अलिप्त' होते. राजसत्तेचे वर्गीय स्वरूप मान्य करण्याची बेडेकर संप्रदायाची अट मात्र त्यांनी पुर्ण केलेली दिसत नाही. तरीपण अन्याय करणाऱ्या वर्गाविरूद्ध, हितसंबंधाविरूद्ध उभे राहण्याची ताकद त्यांच्याजवळ होती, तशी दृष्टी होती, असे मानायला भरपूर जागा आहे. राजसत्तेचे हत्यार वेळप्रसंगी, कालमान पाहून वापरायचे, पण या हत्याराचे आपणच बळी व्हायचे नाही, हा साम्यवादी तत्त्वज्ञानाच्याही पलिकडे जाणारा एक विचार याच्या मुळाशी आहे व महाभारतकाळापासून भारतीय राजनीतीज्ञ तो मांडत आलेले आहेत. 'राजा कालस्य कारणम्' हा सिद्धांत मांडणाऱ्या व्यासांना राजसत्तेचे महत्त्व व स्थान कळले नव्हते असे समजणे जरा धाडसाचेच ठरेल. पण राजसत्ता म्हणजे सर्वकाही नाही, व्यापक समाज जीवनाचा तो एक भाग आहे, या भागावरही योग्य ते नियंत्रण हवे, हे नियंत्रण अखेरीस लोकांच्या हाती पण लोकहिताचा प्रवक्ता म्हणून दंडहीन लोकसेवक याकामी कमी धोक्याचा, असा यतीवर्ग कल्पनेमागील विचार आहे. या यतीवर्गाने अगदी आपत्प्रसंगीच हत्याराला (सत्तेला) स्पर्श केला पाहिजे. नाहीतर हे हत्यारच ते घडविणाऱ्या यतीवर उलटते, त्याचा बळी घेते.

 आपणच घडविलेल्या हत्याराचे बळी होण्याचा दुर्दैवी प्रसंग यतीवर्गावर किंवा आधुनिक परिभाषा वापरायची तर क्रांतिकारक गटावर येतो असा अगदी अलिकडच्या इतिहासाचाही दाखला नाही काय ? केन्द्रीभूत होणे हा कुठल्याही सत्तेचा स्वभाव असतो. मग ती धार्मिक क्षेत्रातील असो वा राजकारणातील असो. अगदी कामगार-किसानांची सत्ताही याला अपवाद ठरू शकत नाही. सत्ता हळूहळू केन्द्रीभूत होते आणि या अतिरिक्त केन्द्रीकरणामुळे ती भ्रष्ट होत जाते, तिचे वर्तुळ लहानलहान होते, ती साचून, साकळून मुठभरांच्या हातचा खळ बनते. हा दोष एखाद्या व्यक्तीचा नसतो. सत्तेच्या या स्वाभाविक प्रवृत्ती -

।। बलसागर ।। १३१