पान:बलसागर (Balsagar).pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

☐ केन्द्रीकरण हा सत्तेचा स्वभाव

 मी लिहिलेल्या 'श्रीगुरुजी' या लेखावर मतप्रदर्शन व टीका करणारा सुधीर बेडेकर यांचा 'गुरुजींनंतरचा रा. स्व.संघ' हा (वरील) लेख माणूस २१ जुलै १९७३ या अंकात प्रसिद्ध झाला आहे. मुख्यत: बेडेकरांचे दोन आक्षेप आहेत. (१) राजसत्तेचे गुंतागुंतीचे, गुंतलेले व वर्गीय स्वरूप मी किंवा लोकसेवक संघाची कल्पना मांडणाऱ्यांनी ध्यानात घेतलेले नाही. त्यामुळे दंडहीन समाजक्रांती हा आमचा विचार अव्यवहार्य, अशक्य कोटीतला आहे. (२) रा. स्व. संघाचे स्वरूप क्रांतिकारक परिवर्तनाला विरोधी आहे. शिवाय या बेडेकरांच्या लेखात काही चुकीची, पूर्वग्रहदूषित विधाने अधूनमधून पेरलेली आहेत, मार्क्सवाद व डावी विचारसरणी यांच्या अंतिम विजयाचा एक ठराविक, काहीसा भाबडा आशावादी सूरही व्यक्त झालेला आहे.

 मुख्य दोन आक्षेपांपैकी पहिल्याचा विचार जरा विस्ताराने करू.

 बेडेकर म्हणतात : शासन हे समाजांतर्गत चालणाऱ्या प्रक्रियांमध्येच गुंतलेले असते. चालू व्यवस्था तगवण्याचे ते एक हत्यार असते; ती तुम्हाला बदलायची असेल तर या हत्याराविषयी उदासीन राहून चालणार नाही. वरिष्ठ वर्गाचे हे हत्यार मोडून टाकून, नव्या व्यवस्थेला साजेसे असे हत्यार पाहिजे.

 "गांधीजींची लोकसेवादलाची कल्पना फसली ती यामुळे. केवळ काँग्रेसवाले स्वार्थी व सत्तालोभी होते म्हणून नव्हे, तर वर्गहीन समाजच फक्त शासनरहित असू शकतो यामुळे."

 यातील 'उदासीन' व 'शासनरहित' हे शब्द महत्त्वाचे आहेत. मी ज्याला 'अलिप्त' लोकसेवा म्हटले, त्याला बेडेकर उदासीनपणा, शासनरहितपणा समजल्यामुळे त्यांचा घोटाळा झालेला आहे. लोकसेवकांनी 'उदासीन' असावे अशी गांधीजींची कल्पना तर निश्चितच नव्हती, गुरुजींचीही नसावी. परंतु राजसत्तेच्या आधीन न होता, त्या यंत्रणेत स्वतःला अडकवून न घेता मुक्तपणे, स्वतंत्रपणे लोकसेवकांनी परिवर्तनाचे, समाजधारणेचे कार्य करावे, एखाद्या खुर्चीत बसून राहण्यापेक्षा लोकात फिरावे, मिसळावे, त्यांना शिक्षण द्यावे, अन्याय असेल तेथे प्रतिकारासाठी सज्ज करावे अशी ही कल्पना आहे. लेखात मी मुद्दामच आर्य चाणक्याची, विद्यारण्यांची उदाहरणे दिली. एकाने नंदांची भ्रष्ट राजवट धुळीला मिळवली होती; दुसऱ्याने दक्षिणेत, मध्ययुगीन भारतात एका स्वतंत्र हिंदु राज्याच्या स्थापनेला चालना दिली. शेवटी या दोन्ही व्यक्ती निवृत्त झाल्या तरी राजसत्तेची एवढी उलथापालथ घडवून आणणाऱ्यांना आपण

।। बलसागर ।। १३०