वणारे लोक व्यापारी, जमीनदार व भांडवलदार आहेत. सर्व देशातले चित्रही हेच साधारणपणे आहे.
मध्यमवर्गीय, ब्राह्मण, शिक्षित तरुणांच्या थरापुढे आज भवितव्य काय आहे? एकांडेपणे तो काहीच करू शकत नाही. कारण तो अल्पसंख्य आहे; तसेच मुख्यत: पांढरपेशा नोकरदार असल्याने आर्थिक-सामाजिकदृष्ट्याही समाजजीवनाच्या नाडयांवर त्याची फारशी पकड नाही. जातीयवादी, बुरसटलेल्या सरंजामी विचारांनिशी तो इतर जाती व कामगार-शेतकऱ्यांशी नाते जोडून वाढूही शकत नाही. हा वर्ग एकतर सधनांबरोबर, जुनाट सरंजामी व भांडवलदार वर्गाबरोबर जाऊन स्वत:चा नाश करून घेऊ शकतो, किंवा कामगार-शेतकऱ्यांबरोबर (म्हणजे ९०टक्के भारतीय राष्ट्राबरोबर!) जाऊन डाव्या चळवळीद्वारा क्रांतीच्या तेजाकडे जाऊ शकतो. पहिला पर्याय स्वीकारणारे तरुणच संघात गेलेले आहेत, भविष्याकडे पाठ फिरवून भूतकाळाकडे वळले आहेत.
जर समाजाच्या विकासाचे काही शास्त्र असेल तर ते संघाच्या विरुद्ध आहे !
थोडक्यात, जर संघाने आपली विचारप्रणाली विज्ञानावर व नव्या मूल्यांवर आधारली, समाजाच्या परिवर्तनाचा शास्त्रशुद्ध कार्यक्रम आखून त्यानुसार संघटना बदलली व कामगार-शेतकऱ्यांशी जुळते घेणारी केली, जर संघाचे वर्गीय स्वरूप बदलून ती एक कष्टकऱ्यांची संघटना झाली तर व तरच संघ सामाजिक समस्या सोडवू शकेल. पण मग तो संघ उरणार नाही! तो एक क्रांतिकारक पक्ष होईल व कदाचित आम्हीही संघात जाऊ !
पण हे होणार नाही आणि म्हणजेच आजच्याप्रमाणे उद्याही संघ ही एक वरवर सांस्कृतिक पण छुपेपणाने विशिष्ट गट सत्तेवर बसवणारी राजकीय शक्ती असणार आहे. लोकशाही न मानणारी, हिंसा व कटबाजीवर विश्वास ठेवणारी हुकुमशाही तऱ्हेची संघटना असेल. सामाजिक व सांस्कृतिक सुधारणेला ती विरोध करेल, चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करेल व मुस्लिमद्वेषाने लोकांचा असंतोष भलतीकडे वळवून कष्टकऱ्यांच्या एकीमध्ये बिब्बा घालत राहील. राष्ट्राच्या नावाने वरिष्ठ वर्गाचे व मूठभरांचे हित साधेल व नव्वद टक्के राष्ट्राच्या क्रांतिकारक चळवळींना राष्ट्रद्रोही म्हणून विरोध करेल.
प. पू. देवरसांनी स्वयंसेवकांना किती प्रामाणिकपणे आत्मटीका करायला सांगितली ते त्यांचे तेच जाणोत. पण श्री. गं. ना अजूनही संघ सुधारेल अशी आशा वाटत असली तर त्यांनी, व संघाच्या सर्व प्रामाणिक व खऱ्या देशप्रेमी स्वयंसेवकांनी आणि हितचिंतकांनी ती सोडून द्यावी हे बरे. इतिहासाच्या रणांगणावर ज्यांचा पराभव अटळ आहे त्यांच्या रथाचे चिखलात रुतलेले चाक वर काढण्याच्या शक्तीचा व्यय कशाकरता ?
☐