पान:बलसागर (Balsagar).pdf/129

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यापलिकडे संघाच्या आर्थिक विचारांची धाव जात नाही. ते कसे गरिबांचे प्रश्न सोडवणार ? मुसलमान द्वेषाने भरलेल्या व 'हिंदू सारा एक ' या पोकळ घोषणेने भारून गेलेल्या एकारल्या बुद्धीला विविध भाषा, धर्म, जाती, प्रांत असलेल्या या खंडप्राय देशाचे प्रश्न सोडवता येणे अशक्य आहे. संघाच्या विचार प्रणालीचा आवाका फार तोटका आहे; आधुनिक विज्ञान व तंत्रशास्त्र, राष्ट्रप्रेम व नेकी आणि सैनिकी संघटना यांनी केवळ विसाव्या शतकाचे प्रश्न सुटत नसतात. ते सोडवण्याकरिता समाजाचे विज्ञान व मानवीपणाचा नवा, खराखुरा अर्थ वाहणारी मूल्ये व ध्येये आवश्यक असतात, ही गोष्ट संघाच्या मंडळींना कधीच लक्षात आली नाही व येईल असे दिसत नाही.

 दुसरी गोष्ट, संघटना ही एखाद्या यंत्रासारखी असते. हे यंत्र कसे आहे व कशाकरता आहे या दोन गोष्टी वेगळ्या काढता येत नाहीत. त्याचा हेतू त्याच्या रचनेशी अविभाज्यपणे बांधलेला असतो. संघाची विचारप्रणालीच नव्हे; सबंध संघटनाच मुळात समाजक्रांतीसाठी बांधली गेली नव्हती व ती तशी बदलणारही नाही. आडमुठ्या बंदिस्त मनाच्या हिंदु-राष्ट्राच्या कल्पनेने भारलेल्या तरुणांना एकत्र आणून, ठाकून ठोकून कडवेपणा आणून, बांधलेली संघटना म्हणजे संघ. समाजापासून अलग पाडून, जनतेच्या विविध व बदलत्या जीवनाचे रंग त्यांना अजिबात लागू न देता संघस्थानावर आणल्या गेलेल्या तरुणांची संघटना संकुचित होऊन साचून गेली नाही तरच आश्चर्य. कामगार लढे लढवणे, दलितांच्या चळवळी उभारणे, खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांना संघटित करून सामूहिक कृतीत आणणे ह्या गोष्टीशिवाय समाज परिवर्तन आज अशक्य आहे. मूठभर निष्ठावंत युवकांनी क्रांती होत नसते हे आता स्पष्ट आहे. संघाची संघटना या गोष्टी करायला असमर्थ आहे. या गोष्टी संघ करू बघेल तर त्यांच्या संघटनेला चिरा जातील, ढिलाई येईल व संघ आजचा संघ उरणार नाही.

 'संघशक्तीचा विनियोग सामाजिक समस्या सोडवण्याकरता केला तर संघशक्तीचा व्यय दुर्बल होईल, मूळ संघटना दुर्बल होईल ही काही स्वयंसेवकांची भीती व्यर्थ आहे,' असे प. पू. देवरस म्हणाले. पण त्यांच्या दुर्दैवाने हेच खरे आहे ! जितका जनतेशी, तिच्या जीवनाशी व झगड्यांशी स्वयंसेवकांचा संबंध येईल तितका त्यांचा कडवेपणा, आडमुठेपणा व अंधश्रद्धा नष्ट होईलच !

 तिसरी गोष्ट, समाजशास्त्राच्या दृष्टीने जर आपण आजच्या भारतीय समाजाचे विश्लेषण केले तर कोणते वर्ग वा गट समाजक्रांती करू शकतील असे दिसते ? संघाचा पाया समाजाच्या कुठल्या थरात रुजलेला आहे ? महाराष्ट्रापुरते बोलायचे तर संघ हा नागपूर-पुण्याच्या, व इतर काही ठिकाणच्या ब्राह्मण, मध्यम व कनिष्ठ मध्यमवर्गातल्या लोकांचा आहे. संघाला पैसे व पाठिंबा पुर-

।। बलसागर ।। १२८