पान:बलसागर (Balsagar).pdf/121

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. कारण, पहिली रचना माणसाची करावयास पाहिजे. तिकडे दुर्लक्ष करण्यात आले. जवळ पैसा मुळीच नाही तरीही घर बांधण्याचा विचार करण्यासारखेच हे अव्यवहार्य आहे. जर व्यवस्थित, सुसंघटित अनुशासनबद्ध शक्ती असेल, संघटनेचे घटक केवळ दक्ष-आरामाशिवाय इतरही अनेक गोष्टी आपल्या बोलण्यातून आणि आचरणातून समाजाला शिकविण्याकरिता समर्थ असतील, म्हणजेच हे पहिले कन्स्ट्रक्शन नीट झाले असेल तरच तथाकथित इतर कार्ये होऊ शकतील."

 हे 'पहिले कन्स्ट्रक्शन नीट झाले' असे केव्हा समजायचे? संघाजवळ भरपूर मनुष्यबळ आहे वगैरे, इतरांच्या काहीही कल्पना असल्या तरी श्री गुरुजी या तथाकथित संख्येविषयी फारसे समाधानी नसावेत. ते अध्यात्मवादी असले तरी संघटनेच्या व्यावहारिक स्थितीसंबंधीची त्यांची कल्पना पूर्ण वास्तववादी होती. म्हणून या भाषणाच्या शेवटी त्यांनी स्वयंसेवकांना निर्वाणीच्या शब्दात सांगितले:

 "आज संघाची आपणाला जी प्रतिष्ठा दिसते ती बरीचशी काल्पनिक आहे. वृत्तपत्रांनी निर्माण केलेली आहे.लोक समजतात की, संघाजवळ अपरंपार मनुष्यबळ व सामर्थ्य आहे. जनतेची संघाविषयीची अपेक्षाही स्वभाविकत:च फार मोठी आहे. पण एकीकडे ही अपेक्षा एवढी मोठी झाली आहे, तर दुसरीकडे कार्याचे स्वरूप प्रत्यक्ष घटले आहे. दोन वर्षांपूर्वीची संख्या, कार्याचा जोम, वातावरण, प्रचारक वगैरे गोष्टींशी तुलना केली असता कार्याचा प्रत्यक्ष प्रभाव कमी झालेला आहे असेच म्हणावे लागेल. मध्यंतरीची स्थिती लक्षात घेता (बंदीकाल) यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही; परंतु दोन वर्षांपूर्वी थांबलेला प्रवाह पुन्हा परिपूर्ण गतीने वाढू लागण्याची आज किती पराकाष्ठेची आवश्यकता आहे याचा विचार करा. एक विशिष्ट प्रकारची संघटनेची व्यवस्था उत्पन्न होईपर्यंत समाजसेवेची अन्यान्य कार्य होऊ शकत नाहीत हे जाणून, त्या मर्यादेपर्यंत पोचण्याचा कसोशीचा प्रयत्न आज आवश्यक आहे. त्या मर्यादेकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या बोलण्याने, कृतीने, व्यवहाराने व चारित्र्याने सर्वत्र हा भाव निर्माण केला पाहिजे की, समाजसेवा करण्याची पात्रता कोणात असेल तर ती यांच्यात आहे. हे कार्य जर नसेल तर अखंड राष्ट्ररूपाने समाज उभा कसा राहू शकेल? अशी व्यापक भावना आपल्या संपर्काने समाजात उत्पन्न केली, कार्याला प्रतिष्ठा मिळविली तरच अन्यान्य समाजसेवेच्या कार्याचा विचार करणे योग्य होईल. आज आपली जी स्थिती आहे तिचा विचार करता, कार्याची योग्यता विशिष्ट मर्यादे. पर्यंत नेण्याऐवजी, भिन्न भिन्न समाजकार्याचाच अंगिकार करीत बसणे मला तरी सर्वस्वी अयोग्य वाटते. जनतेची अपेक्षा, आपल्या योग्यतेविषयीची कल्पना, शतगुणित झालेली आहे, तर इकडे कार्याची अवस्था घटलेली आहे. अशा

।। बलसागर ।। १२०