पान:बलसागर (Balsagar).pdf/119

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जाणीव विकासाचा मूलभूत पाया जर व्यवस्थित घातला गेला असेल तर विधायक कार्याची उभारणी किती निर्दोष व अल्प कालावधीत होऊ शकते याचे उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्हा विकास प्रकल्प हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

 या गोंडा विकास प्रकल्पाची माहिती देणारी एक लेखमालाही पुण्याच्या तरुण भारतने याच सुमारास प्रसिद्ध केली आहे. लेखक कृष्णा जोशी.

 गोंडा हा नेपाळ-सीमेलगतचा अगदी मागासलेला व डोंगराळ मुलुख. नानाजी देशमुखांनी आपल्या दीनदयाळ शोध संस्थानच्या वतीने या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार केला व जनता पक्षाच्या राजकारणातून निवृत्त झाल्यावर त्यांनी आपली सर्व शक्ती या विकास प्रकल्पावर केन्द्रित केली. शेकडो कार्यकर्ते ग्रामोदयाचे स्वप्न साकार करण्यासाठी येथे आज झपाटून काम करत आहेत. उत्तर प्रदेश किंवा केन्द्र सरकारलाही गेल्या ३५ वर्षात जे करून दाखवता आले नाही ते, या कार्यकत्यांच्या प्रयत्नामुळे, अवघ्या पाच वर्षांत तेथे उभे राहू शकले आहे. अनेक जाणकारांनी हा नवनिर्माणाचा, विधायक कार्याचा प्रयोग आजवर पाहिलेला आहे व आपले अनुकूल अभिप्राय नोंदवलेले आहेत. भारत सरकारच्या कृषिमंत्रालयद्वारा संचालित राष्ट्रीय विकास संस्थेने, डिसेंबर १९८० मध्ये एक समिती गोंडा प्रकल्पाची पहाणी करण्यासाठी नेमली होती. समाजकार्यासाठी असलेले १९८२ सालचे नेहरू पारितोषिक ज्यांना देण्यात आले ते श्री. प्रेमजीभाई या समितीचे निमंत्रक होते. श्री. प्रेमजीभाई यांनी जानेवारी ८१ मध्ये राष्ट्रीय विकास संस्थेच्या चिटणिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, "गरिबी हटवण्यासाठी मागास प्रदेशात जलसिंचन योजना राबवून कृषिउत्पादन अगदी अल्पकाळात कशा प्रकारे वाढविता येईल याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शासन व स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्यावर साकार झालेले गोंडा जिल्ह्यातील प्रकल्प. राष्ट्रीय विकास संस्थेने दिलेले आर्थिक साहाय्य मामुलीच होते; पण अर्थवितरण संस्थांनी सुमारे १२ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले व त्यामुळे २७ हजारांहून जास्त कूपनलिकांद्वारा अडीच लाख एकर जमीन लागवडीखाली आली व दोन हजार आठ गावातील पंचाण्णव हजार किसानांना त्यांचे आर्थिक दारिद्रय दोन-अडीच वर्षात दूर करता आले."

 बी. जी. व्हर्गिज हे या विषयातले एक तज्ज्ञ पत्रकार मानले जातात. इंडियन एक्स्प्रेसच्या (दिल्ली) २५ व २६ नोव्हेंबर ८१ या अंकात त्यांनी दोन लेख या गोंडा प्रकल्पावर लिहिले आहेत. ते म्हणतात, "दीनदयाळ शोध संस्थानने कूपनलिका खोदल्या नाहीत. त्यांनी जनतेला प्रवृत्त केले, प्रेरणा दिली व किसानांना शासन व वित्तीय संस्थांद्वारा मिळणाच्या सवलती व कर्ज यांचा फायदा घेऊन कुपनलिका बसवून घेण्यास मदत केली. अशा प्रकारच्या प्रेरक संघटनांची आवश्य-

।। बलसागर ।। ११८