पान:बलसागर (Balsagar).pdf/116

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सर्व हिंदूंचे राज्य ! हिंदूपदपातशाहीसाठी ते लढले, त्यांनी स्वत:ला राज्याभिषक करवून घेतला व त्यांचीच परंपरा पुढे पहिल्या बाजीरावाने, सदाशिवरावभाऊने चालवली. पानपतला दोन लाख मराठी बांगडी फुटली हे दुर्दैव; पण यश किंवा अपयशापेक्षा या युद्धामागची मराठी प्रेरणा महत्त्वाची ! संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला प्रथम गेल्यावर, म्हणूनच, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्यांना आजही, पानपतची धूळ मस्तकी लावावीशी वाटते. अशी ऐतिहासिक प्रेरणा ही अखिल भारतीय राजकारण करण्याची प्रवृत्ती दक्षिणेकडे मुळातच कमी आढळते. म्हणूनच आंध्रमध्ये रामाराव चटकन पुढे येतात, विजयीही होतात ! प्रांतिक भावनांना अनुकूल असे वातावरण तेथे तयारच असते. महाराष्ट्रात ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद असला, दलित - अदलित भेद असले तरी द्रविड मुन्नेत्रसारखी चळवळ येथे कधीच उभी राहिलेली नाही. या अर्थाने सावरकरांनी महाराष्ट्राला भारताचा खड्गहस्त म्हटलेले आहे. आपापल्या प्रांतापुरते राजकारणच देशात यापुढे वाढणार असेल तर भारतीय राजकारणाचा विचार कोण करणार ? देशासमोरील राजकीय - आर्थिक संकटांच्या सोडवणुकीसाठी कोण पुढे सरसा वणार ? आसामचा प्रश्न आंध्र - तामिळनाडूला आज स्पर्श तरी करताना दिसतो का ? तसाच काश्मिरचा प्रश्न. या प्रश्नाची त्वरित सोडवणूक झाली नाही, तर तेथे दुसरा आसाम तयार होईल ! चीन - पाकिस्तानच्या सीमा काश्मिरला भिडलेल्या आहेत. अमेरिकेला तळ हवेच असतात. एकदा येथले उरलेसुरले हिंदू भारतात हाकलले की, काश्मिरचे आसामच काय, पॅलेस्टाइन करायलाही सगळे मोकळे ! प्रादेशिक पक्षांचा आवाकाच मर्यादित असतो. काश्मिर - आसामसारखे किवा नाणेनिधी कर्जासारखे भारतव्यापी प्रश्न या आवाक्यात बसूच शकत नाहीत आणि हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे असतात, जितके बेळगाव - कारवारसारखे किंवा पाणी - वाटपासारखे प्रश्न असतात. म्हणून इतरत्र जरी प्रादेशिक पक्ष, आपापल्या राज्यापुरते असलेले राजकारण डोके वर काढत असले तरी महाराष्ट्राने या लाटेत बुडून जाणे, हे आजवरच्या इतिहास परंपरेशी विसंगत ठरणार आहे. महाराष्ट्राचे खास प्रश्न आहेत, त्यांच्याकडे लक्ष पुरविले गेले पाहिजे यात वाद नाही; पण हे प्रश्न अखिल भारतीय चौकटीतच सोडवण्याची आजवरची महाराष्ट्रीय नेतृत्वाची शिकवण आहे. मग तो काळ शिवाजीचा असो की नेहरूंचा. हा वारसा महाराष्ट्राने सोडू नये. महाराष्ट्राला राष्ट्रीय प्रवाहाची मुळातच ओढ आहे. या व्यापक प्रवाहाचे विस्मरण झाले तर महाराष्ट्र हा महाराष्ट्र तरी राहील का ? असा काही काळ जातो की

।। बलसागर ।। ११५