पान:बलसागर (Balsagar).pdf/115

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 

 खड्गहस्त....

 

 दक्षिणेकडे तेलगूदेशम् या पक्षाने मिळविलेल्या नेत्रदीपक व स्पृहणीय यशामुळे महाराष्ट्रातही प्रादेशिक पक्ष काढून सत्ता हस्तगत करावी, असे अनेकांना वाटू लागलेले आहे. समाजवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पवार यादृष्टीने हालचाल करीत असावेत. त्यांना काही पत्र पंडितांचा, मित्रपरिवाराचा पाठिंबा मिळत असावा; पण कावेरीचे पाणी वेगळे, मुळा मुठेचे, भीमा-इंद्रायणीचे पाणी वेगळे, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्राने आजवर प्रादेशिक राजकारण केलेले नाही. अगदी इतिहास काळापासून महाराष्ट्राची राजकीय प्रवृत्ती अखिल भारतीय राजकारण करण्याची आहे. शिवाजी किंवा पहिला बाजीराव, नंतर रानडे - गोखले - टिळक, नंतरचे सावरकर - आंबेडकर किंवा आजचे डांगे - एस. एम. जोशी – यशवंतराव चव्हाण वगैरे सर्व नेते देशाचे राजकारण करणारे होते -- आहेत. दिल्लीवर, अखिल भारतावर या नेत्यांचा प्रभाव पडला की नाही, ते किती प्रमाणात यशस्वी -अयशस्वी ठरले, हा प्रश्न वेगळा. पण या सगळ्यांची प्रवृत्ती, राजकीय बैठक अखिल भारतीय होती. दक्षिणेकडे, तामिळनाडू किंवा आंध्रप्रदेशातून अशी अखिल भारतीय राजकारणाची परंपरागत प्रवत्ती दिसून येत नाही. नादिरशहा किंवा अहमदशहा अब्दाली दिल्लीवर चालून आला तेव्हा महाराष्ट्रातून फौजा घेऊन जायची तशी काय आवश्यकता होती ? शिवाजीमहाराजांना सर्व दक्षिणेकडची सुभेदारी औरंजेबाकडून सहज मिळवता आली असती; पण त्यांना हवे होते हिंदवी स्वराज्य - दक्षिणोत्तर

।। बलसागर ।। ११४